२० लाख रुपये किमतीचे ४० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले
#ठाणे
मावस बहिणीचे कपडे परिधान करणे, चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळून चोरलेल्या लॉकर्सच्या चावीने ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. मात्र, चपलेने घात केला. पोलिसांना सीसीटीव्हीतील चप्पल आणि बहिणीची चप्पल एकच दिसली. त्यावरून पोलिसांनी चोरी उघड करत दागिनेही हस्तगत केल्याची घटना डोंबिवलीतील खोणी पालवा येथे घडली.
मानपाडा पोलिसांनी चप्पल आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी सिमरन पाटील (वय २७, रा. कामोठे, नवी मुंबई) हिला अटक केली आहे. तिच्याकडून २० लाख रुपये किमतीचे ४० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरी उघड केली. या प्रकरणी प्रिया सक्सेना यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी सिमरन या १३ जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी कामोठे नवी मुंबई येथे गेल्या होत्या. रात्रीच्या गर्दीचा फायदा घेऊन मावस बहीण सिमरनने प्रियाच्या पर्समधून घराची, तिजोरीची चावी आणि एंट्री कार्ड चोरले. त्यानंतर आरोपी सिमरन ही प्रिया यांच्या घरी रिक्षाने पोहोचली.
कोणालाही संशय येऊ नये यासाठी प्रिया यांचे कपडे तिने परिधान केले. सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दिसू नये यासाठी तिने आपल्या चेहऱ्याला स्कार्फ देखील बांधला. त्यानंतर चोरलेल्या चावीचा आधार घेत ती घरात शिरली. त्यानंतर तिजोरीतील तब्बल ४० तोळे सोने चोरी केले. त्यानंतर पुन्हा ती त्याच कार्यक्रमात पोहोचली. चोरी केलेले दागिने तिने एका डॉक्टर मित्राकडे ठेवायला दिले.
दरम्यान, या भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात फिर्यादीची मावस बहीण सिमरन पाटील हिची संशयास्पद वागणूक दिसली. तसेच तिने ड्रेस बदलला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, पायातील चप्पल तीच असल्याने पोलिसांची शंका बळावली. त्यातून ही चोरी उघड झाली.