किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा
#मुंबई
भाजपची मुलूखमैदान तोफ आणि विरोधकांचे पुरावे बाहेर काढून कायम चर्चेत राहणारे नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सोमय्या यांच्या कार्यालयात श्रवणयंत्रांचा घोटाळा झाला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी सोमय्या यांच्या मुलुंड पूर्वमधील निर्मलनगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी नवघर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून दोघांवर गुन्हे दाखल झाल्याचे समजते.
प्रफुल्ल कदम हे सोमय्या यांच्या कार्यालयाचे पाच वर्षांपासून काम पाहतात. सोमय्या हे युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते. ट्रस्टकडून दिव्यांग तसेच एड्सबाधितांसाठी काम केले जाते. त्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेची मदत घेतली जाते. या ट्रस्टमध्ये श्रवणयंत्रांचा घोटाळा झाला आहे.
युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट २०१७-१८ पासून ‘ऐका स्वाभिमानाने’ हा उपक्रम राबवते. यात ज्येष्ठ नागरिकांना फक्त पाचशे रुपयांत श्रवणयंत्र दिले जाते. या श्रवणयंत्र वाटपामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. ट्रस्टतर्फे आयोजित शिबिरातून श्रवणयंत्रांचे वाटप होते. मात्र, प्रकल्पप्रमुख प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांच्यावर हा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ट्रस्टने काही दिवसांपूर्वी श्रवणयंत्रांचा हिशोब विचारला असता प्रज्ञा गायकवाड यांनी सर्व यंत्रांचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, तपासणी केली असता १४७२ यंत्रे आणि ७ लाख रुपयांची तफावत आढळली. याबाबत अधिक चौकशी केली असता प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांनी गैरव्यवहाराची कबुली दिली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
वृत्तसंस्था