बारावी गणिताचा पेपर फुटला
#बुलढाणा
बारावी परीक्षेचे पेपर फुटण्याची परंपरा यंदाही सुरूच असून शुक्रवारी (दि. ३) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे.
हा पेपर सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभेतही या पेपरफुटीचे पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार काय करत आहे? सरकार झोपले का? असा सवाल उपस्थित केला. बोर्डाकडून पेपर फुटीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता. बारावीचा गणिताचा पेपर कोणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कोणाचा हात आहे? यामागे कोणते रॅकेट सक्रीय आहे? याचा तपास सध्या केला जात आहे.
या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.वृत्तसंस्था