संग्रहित छायाचित्र
पुणे : रस्त्यावर वाहने चालविताना झालेल्या किरकोळ वादामधून अनेकदा गंभीर घटना घडल्याचे पाहायला मिळते. अशीच हृदयाचा थरकाप उडविणारी घटना सिंहगड रस्ता येथील हिंगणे खुर्द येथे घडली. दुचाकीला ओव्हरटेक करण्यामुळे झालेल्या वादामधून एका दुचाकीस्वार तरुणाचा कोयत्याने तब्बल ३५ वार करीत निर्घृण खून करण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय मारुती सुर्यवंशी (वय २०, रा.गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी हा तरुण एका मिठाई दुकानात काम करीत होता. अल्पवयीन आरोपी मुले आणि तो एकाच भागात राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये शुक्रवारी दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तो घरासमोर उभा होता. त्यावेळी अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी क्षणार्धात त्याच्यावर हल्ला चढवत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तब्बल ३५ वार त्याच्यावर करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी पसार झाले. नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी जखमी सूर्यवंशीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींपैकी दोन अल्पवयीन आरोपींना रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार शहरातून पसार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहे.