गोळीबारातील जखमी तरुणाचा मृत्यू; सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या पिस्तुलातून झाला होता गोळीबार

बैलगाडा शर्यतीच्या बैल खरेदीतील व्यवहारातून झालेल्या वादामधून शेतकरी तरुणाच्या डोक्यात सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या मुलाने गोळी झाडली होती.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

बैलगाडा शर्यतीच्या बैल खरेदीतील व्यवहारातून झालेल्या वादामधून शेतकरी तरुणाच्या डोक्यात सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या मुलाने गोळी झाडली होती. या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणाचा बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना बारामतीमधील निंबूत येथे घडली होती. या प्रकरणी पाच जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोळी झाडण्यात आलेले पिस्तूल शहाजी काकडे यांचे असल्याचे समोर आले असून वडिलांच्या पिस्तुलातून मुलाने गोळी झाडत हा खून केला.

रणजित निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गौरव शहाजी काकडे, गौतम शहाजी काकडे (दोघे रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंकिता रणजित निंबाळकर (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम काकडे याने रणजित निंबाळकर यांच्याकडून ‘सुंदर’ नावाचा बैल खरेदी केला होता. हा व्यवहार ३७ लाख रुपयांना ठरला होता. या व्यवहारापोटी काही रक्कम विसार म्हणून काकडे याने निंबाळकर यांना दिली होती. उर्वरित रक्कम घेऊन जाण्यासाठी निंबाळकर यांना निरोप देण्यात आला होता. रणजीत गुरुवारी काकडे यांच्या निंबूत येथील घरी गेले होते. त्यावेळी झालेल्या वादामधून  गौतमने त्यांच्यावर साथीदारांसह हल्ला चढवला होता. पिस्तुलातून निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली होती.

त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल शहाजी काकडे यांचे असून, काकडे यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. मात्र, त्यांनी गौरवला हे पिस्तूल दिले होते का त्याने परस्पर घेतले होते याचा तपास सुरू आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest