संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अशीच एक घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. दोन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना परिसरात सोमवारी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक २४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सक्षम बगाडे, सागर सरोज यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी गौरव मरकड आणि आरोपी सक्षम आणि सागर यांच्यात वाद आहेत. आपसातील वाद मिटवण्याचा बहाणा करून आरोपींनी गौरवला आणि त्याच्या मित्राला सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात बोलावले होते. गौरव त्याच्या मित्रासह तिथे पोहोचला. त्यानंतर आरोपींनी गौरव आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून पसार झाले.
आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात गौरव आणि त्याचा मित्र दोघेही गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सक्षम आणि सागर यांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.