संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. बांधकाम सुरु असताना कामगार कायद्यानुसार कामगारांची सुरक्षितता महत्वाची आहे. परंतु अनेख ठिकाणी नियमांना हातताळ फासला जात आहे. त्यामुळे कामगारांना जीव गमवावा लागत आहे. बाणेर भागात अशीच घटना घडली असून एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजितवरुन लाल बघेल (वय २५, रा. वृंदानंग ब्लिस सर्वे नं. १८/०१, स्टर्लींग टॉवर शेजारी पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर, मुळ रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी आदिनाथ राहीगुडे (वय ५४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चतु: श्रृंगी आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार वृंदानंद ब्लिस या बांधकाम इमारतीचे बांधकाम व्यावसायिका उत्तम रमनिकभाई मकवाना (वय ४०, रा. माया बिल्डींग गंगा सॅटेलाईट वानवडी), ठेकेदार राजूगंग्यानायक विस्लावथ (वय ३६, रा, विठ्ठल दर्शन बिल्डींग, विठ्ठलनगर, आंबेगाव), साईटइंजिनीयर सागर रामचंद्र पवार (३७, श्रीदर्शन सोसायटी बि विंग, आंबेगाव बुद्रक), प्रोजेक्ट मॅनेजर सेल्स हेड परेश हरिलाल राघवानी (वय ३८, रा. शिवानंद गार्डन, वानवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागात वृंदानंद ब्लिस या प्रकल्पाअंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर कामगार त्याला दिलेले काम करण्यासाठी गेला होता. काम करताना त्याचा तोल जावून तो खाली पडला, यात त्याचा मृत्यू झाला. कामगारांची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करुन कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाय योजना केली नाही. हयगीने व निष्काळजीनपणाचे कृत्य करुन काम कामगार अजित बघेल यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कामगार सातव्या मजल्यावरुन पडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच बाणेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक झरेकर, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके करत आहेत.