संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरात महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटना एकामागे एक समोर येऊ लागले आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
रुग्णालयाच्या रेडिएशन डिपार्टमेंटच्या चेंजिंग रूममध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आला. पीडितेने सुरक्षा व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, या महिलेने हिम्मत दाखवत चतुःश्रुंगी पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत आरोपी सुपरवायझरला अटक केली आहे.
हा प्रकार २९ जून २०२४ रोजी घडला. सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २९ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी बेनगुडे हा हाउसकिपिंग सुपरवायझर म्हणून रुग्णालयात नेमणुकीस आहे. पीडित महिला या रुग्णालयात एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून काम करते. फिर्यादी महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे ते दोघे विभक्त राहतात.
ही महिला २९ जून रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. काम संपल्यानंतर त्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होत्या. त्या दिवशी त्यांना दुपारची पाळी लावण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना आरोपी भेटला. त्याने रेडिएशन विभागात धूळ असल्याचे सांगत तिथे स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या. फिर्यादी रेडिएशन ओन्कोलॉजी विभागात स्वच्छता करण्यासाठी गेल्या.
संध्याकाळी सहाच्या सुमारास बेनगुडे तेथे आला. त्याने दरवाजा बंद केला. फिर्यादींना जबरदस्तीने चेंजिंगरूमध्ये ढकलत नेले. फिर्यादीने विरोध केल्यानंतरदेखील त्याने बलात्कार केला. या प्रकारामुळे फिर्यादी प्रचंड घाबरल्या. भीतीने त्यांना रडू कोसळले. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगितले तर कामावर काढून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादी घाबरून घरी गेल्या. कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे त्यांनी कोणाकडे वाच्यता केली नाही. याबाबत त्यांनी काही दिवसांनी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पीडितेने चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.