संग्रहित छायाचित्र
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून, तीन वर्षांच्या मुलाला आळंदी येथे बेवारस सोडून आरोपी पसार झाला होता. त्यापूर्वी त्याने महिलेचा मृतदेह खंबाटकी घाटात फेकून दिल्यावर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मात्र, संबंधित महिलेच्या वर्णनाशी मिळताजुळता मृतदेह मिळाला आणि पोलिसांना तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली.
दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर जयश्री मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. दिनेशने लिव्ह इनमध्ये असताना जन्माला आलेल्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि जयश्री गेल्या पाच वर्षांपासून वाकडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगादेखील आहे. दिनेशचे लग्न झालेले असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत.
जयश्रीचा सात वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. जयश्री पतीसोबत राहात नव्हती. जयश्री आणि दिनेशचे काही दिवसांपासून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत असे त्याबरोबरच सारखे राहण्याबद्दल आग्रह करीत असे.
२४ नोव्हेंबर रोजी भूमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीतील हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा काही वेळातच जीव गेला. दिनेशला काही समजायच्या आत तिचा मृत्यू झाला होता.
दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट साताऱ्यातील खंबाटकी घाट गाठून घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये आला आणि २५ नोव्हेंबर रोजी जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, जयश्रीचं वर्णन असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. पोलिसांच्या तपासात यामागे दिनेश असल्याचे निष्पन्न झाले. नराधम दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले. बेवारस मुलाला शोधण्यासाठी पोलिसांनी याबाबतची पोस्टदेखील व्हायरल केली होती.