संग्रहित छायाचित्र
गळ्यात ‘गोल्ड चेन’ घालण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. याच सोन्याच्या साखळीच्या लोभापायी दोन तरुणांनी चोरी केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. सोनसाखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्यानंतर या साखळ्या गळ्यात घालून हे तरुण पसार झाले.
या घटना सिंहगड रस्ता परिसरात आणि वडगाव बुद्रुकमध्ये घडल्या. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दीपक वसंत पवार (वय ३२, रा. दीपाली अपार्टमेंट, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. एक तरुण पवार यांच्या ओम ज्वेलर्स या सराफी पेढीत आला. त्याने आपला वाढदिवस असल्याचे सांगत सोनसाखळी खरेदी करायची असल्याची बतावणी केली. पवार यांनी दाखवलेल्या दोन सोनसाखळ्या गळ्यात घातल्यानंतर त्याने दुकानातील आरशात पाहण्याचे नाटक केले. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधली हा चोरटा दुचाकीवरून पसार झाला.
दुसरी घटना वडगाव बुद्रुक भागातील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडली. या प्रकरणी अशोक बन्सीलाल पटेल (वय २६, रा. श्रीगंगा गॅलेक्सी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली. पटेल हे दुकानामध्ये काम करीत होते. एक तरुण सोनसाखळी खरेदीसाठी दुकानात शिरला. त्यावेळी चहा विकण्यासाठी एक मुलगा दुकानात आलेला होता. दरम्यान, चोरट्याने त्याची दुचाकी सुरूच ठेवलेली होती. ही सोनसाखळी गळ्यात घालत त्याने आरशात पाहण्याचे नाटक केले. त्याला चहा विक्रेत्या मुलाने दुचाकी बंद करण्यास सांगितले. चोरटा दुचाकी बंद करण्यासाठी दुकानाबाहेर गेला. तो गाडीवर बसला आणि पसार झाला.