Vijay Dhume murder : विजय ढुमेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून महिलेच्या प्रियकराकडून खून

हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत खून केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 1 Oct 2023
  • 01:56 pm

विजय ढुमेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून खून

पुणे : हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत खून केला होता. विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. ढूमेचा खून अनैतिक संबंधातून झाला असून सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, धनकवडी, इंदापूर, पिंपरी चिंचवड मधून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

पोलीस वसाहतीतील मुलांबरोबरीनेच (लाईन बॉइज) ढुमे यांचे शहरातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध होते. हॉटेलवादातून ढुमे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींशी व्यावसायिक भागीदारी होती.  विजय हा निवृत्त पोलिसाचा मुलगा होता. त्याचे वडिल पुणे शहर पोलीस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्तीवेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. सासवडनजीक असलेल्या ढुमेवाडी येथील ढुमे हे मुळचे रहिवासी होते. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.

शनिवारी (३० सप्टेंबर) दुपारी काळेवाडी स्मशानभूमीत ढुमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस वसाहतीतील मुले आणि राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काळेवाडी स्मशानभूमी परिसरात वाकड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ढुमे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest