संग्रहित छायाचित्र
लग्नाच्या आमिषाने दोन तरुणींवर अत्याचार झाल्याच्या दोन भिन्न घटना हिंजवडीमध्ये घडल्या आहेत. यातील एक पीडित युवती ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, मॅट्रीमोनिअल साईटवरून आरोपीची ओळख झाली होती.
अभिषेक राजेंद्रकुमार श्रीवास्तव (वय ३०, रा. लखनऊ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या २४ वर्षीय इंजिनिअर युवतीने फिर्याद दिली आहे. आपल्या घरच्यांचे लग्नाचे बोलणे सुरू आहे. आपण आता लग्न करणारच आहोत असे म्हणत, अभिषेक याने हिंजवडीमध्ये तरुणी राहात असलेल्या आलिशान सोसायटीमध्ये येऊन दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार देऊन आरोपीने पीडित युवतीशी संपर्क बंद केल्याने तिने फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत लैंगिक अत्याचारानंतर गरोदर राहिलेल्या तरुणीस गर्भपातासाठी डिहायड्रेशनच्या गोळ्या दिल्या. तसेच लग्नासही नकार दिला म्हणून, आलोक भीमसिंग शुक्ला (वय २८, रा. पी.जी, हॉटेल सनराईजजवळ, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे. मूळ गाव लखनौ, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. १४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १८ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत मारुंजी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख आहे. आरोपीने या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. यातून ती तरुणी गरोदर राहिली असता आरोपीने तिचा गर्भपात होण्यासाठी डिहायड्रेशनच्या गोळ्या दिल्या. तसेच लग्नास नकार देऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.