पुणे : खंडणी प्रकरणी दोन पोलिसांना केले निलंबित

फर्नेस ऑईलची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे सांगत तेलाची वाहतूक करणारा टँकर अडवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तसेच त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारणाऱ्या तोतया पत्रकाराला खंडणी घेताना अटक करण्यात आली होती.

pune police extortion case

पुणे : खंडणी प्रकरणी दोन पोलिसांना केले निलंबित

ऑईल टँकर अडवत खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराच्या संपर्कात राहणे भोवले

फर्नेस ऑईलची बेकायदा वाहतूक करीत असल्याचे सांगत तेलाची वाहतूक करणारा टँकर अडवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तसेच त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारणाऱ्या तोतया पत्रकाराला खंडणी घेताना अटक करण्यात आली होती. या तोतया पत्रकाराच्या संपर्कात गुन्हे शाखेचे दोन पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या खंडणी प्रकरणात त्यांच्या सहभागाविषयी तपास केला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. (pune police extortion case)

पोलीस हवालदार ज्ञानदेव गोरख गिरमकर आणि पोलीस नाईक शिरीष श्रीहरी गोसावी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. राहुल मच्छींद्र हरपळे (वय ३५, रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे तोतया पत्रकाराचे नाव आहे. या प्रकरणी बाळू आण्णा चौगुले (वय ४४, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौगुले यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या तेलवाहू टॅंकरवर अब्दुल शेख हे चालक म्हणून काम करतात. मागील आठवड्यात शुक्रवारी पहाटे अब्दुल शेख हे टँकर घेऊन कवडीपाट टोलनाक्यावरून जात असताना, लाल रंगाच्या स्विफ्टमधून आलेल्या तिघांनी टँकर अडविला. गाडीतून उतरलेल्या तिघांनी पोलीस असल्याची बतावणी केली. अब्दुल शेख यांना दमदाटी करून टँकरच्या मालकाला बोलव, अन्यथा पोलीस केस करण्याची धमकी दिली. शेख यांनी याबाबतची माहिती बाळू चौगुले यांना फोनवरून कळवली. त्यानंतर बाळू चौगुले व त्यांचा मित्र सुदीप अवघडे अडीच वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोल नाक्याजवळ पोहोचले.

टोलनाक्याजवळ पोहोचताच, बाळू चौगुले यांनी स्विफ्टमधील दोघांची भेट घेतली. तसेच टँकर अडवून ठेवण्याचे कारण विचारले असता, तुमच्या टँकरमधून फर्नेस ऑईलची वाहतूक केली जात असून, त्यासाठी तुमच्यावर केस करण्यात येईल, असे स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना सांगितले. यावर घाबरलेल्या चौगुले यांनी केस न करण्याची विनंती करताच, टँकर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच दहा लाख रुपये न दिल्यास चौगुले यांना जिवे मारण्याचीही धमकी देण्यास सुरुवात केली. धमकीमुळे घाबरलेल्या चौगुले यांनी दहा लाखांऐवजी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. मात्र, पैसे जवळ नसल्याने तासाभराची सवलत मिळावी, अशी विनंती केली. यावर स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना ९२८४६६११४४ हा मोबाईल नंबर दिला आणि निघून गेले.

दरम्यान, तासाभरानंतर पैसे जमा होताच, चौगुले यांनी आपल्या मोबाईल फोनवरून ९२८४६६११४४ या नंबरवर फोन करत अडीच लाख रुपये घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी संबधित ॲपवर पाहणी केली असता, सदर नंबर हा राहुल हरपळे याच्या नावावर असल्याचे दिसून आले. तसेच राहुल हरपळे हा पोलीस नव्हे, तर न्यूज प्रहार या बोगस यूट्यूब चॅनेलचा कथित पत्रकार असल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले. मात्र, भीतिपोटी चौगुले यांनी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहुल हरपळे व त्याचा मित्र सुदीप अवघडे यास गुलमोहर मंगल कार्यालयाजवळ अडीच लाख रुपये नेऊन दिले. तसेच ही बाब हडपसर पोलिसांत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन, राहुल हरपळे व त्याच्या दोन सहकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. हरपळे आणि त्याच्या पत्नीवर खंडणी, दारू विक्री, दारू वाहतूक यासारखे आणखी काही गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हडपसर भाजी मार्केटमधील एकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याच्या नावाखाली लुटल्याचा गुन्हाही हरपळे याच्यावर दाखल आहे.

...असा निष्पन्न झाला पोलिसांचा सहभाग
हडपसर येथे एक टँकर पकडला असून, तो सोडून देण्यासाठी पोलीस तडजोड करीत असल्याचा मेसेज वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या व्हॉट्स ॲप  ग्रुपवर आला होता. त्याची चौकशी दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे देण्यात आली होती. हरपळे याने हा टँकर पकडल्यानंतर त्याचे मित्र असलेले गिरमकर आणि गोसावी त्या ठिकाणी गेले. त्यांनी नियमानुसार वरिष्ठांना टँकर पकडल्याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, दोघांनी माहिती दडवून ठेवली. तसेच टँकरची नोंददेखील केली नाही. कोणतेही अधिकार नसताना टँकरची चावी आणि कागदपत्रे या दोघांनी ताब्यात घेतली होती. हरपळे याने हा टँकर सोडून देण्यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. हरपळे, गिरमकर आणि गोसावी यांच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. हे दोघेही हरपळेच्या संपर्कात होते. दोघांनी केलेले वर्तन हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest