सिंहगड पोलीस ठाण्यातून दोन बांगलादेशी चोरट्यांचा पोबारा
#सिंहगड रस्ता
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेले दोन बांगलादेशी नागरिक सिंहगड पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पसार झालेल्या या नागरिकांविरुद्ध परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीच्या गुन्ह्यात दोन बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली होती. या दोघांना परत पाठवण्यासंबंधीची प्रक्रिया पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून सुरू होती, तसे आदेशही काढण्यात आले होते. त्यानुसार गेले सात महिने हे नागरिक सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात राहात होते. पोलिसांकडून त्यांची जेवण, राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
विशेष शाखेने त्यांना बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. याबाबत तेथील दूतावासाशी पोलिसांनी संपर्क साधला होता. मात्र, या दूतावासाने पोलिसांना प्रतिसाद दिला नसल्याने गेले सात महिने ते पोलीस ठाण्यात वास्तव्यास होते. ७ जून रोजी दोघे पोलीस ठाण्यातून पसार झाले.
दरम्यान, सात वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तहेराला ताब्यात घेतले होते. त्याला पाकिस्तानात परत पाठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्या वेळी पाकिस्तानी नागरिक सहकारनगर पोलीस ठाण्यातून पसार झाला होता.
feedback@civicmirror.in