संग्रहित छायाचित्र
सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी कात्रज गावात ही घटना घडली. या टोळक्याकडून पोलिसांनी कोयते, दुचाकी, मिरची पूड जप्त केले.
याप्रकरणी, यश रोहीदास बोरकर (वय १८), प्रसाद राजू कांबळे (वय १९), आर्यन दत्तात्रय काळे (वय १८, रा. गणेश कॉलनी, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी चेतन गोरे यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गावातील गणेश मित्र मंडळाजवळ काही जण कोयते आणि इतर शस्त्रांसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने तातडीने सापळा रचला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून कोयते, पालघन, मिरची पूड, आणि दुचाकी जप्त केली. आरोपींच्या गटातील तीन जण फरार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. एका अल्पवयीनावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे देखील समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.