संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसांमध्ये बंद सदनिकांची पाहणी करून चोरी करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. असाच एक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत घडला आहे. दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून कपाटातील अमेरिकन डॉलर्स चोरून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील एका हाऊसिंग सोसायटीत राहतात. १८ नोव्हेंबर रोजी त्या त्यांच्या पतीसह दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या नातीला शाळेतून आणण्यासाठी कुलूप लावून घराबाहेर पडल्या. तासभराने ते त्यांच्या नातीसह शाळेतून घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तोडले असल्याचे त्यांना आढळले. घरात बघितले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातल्या बेडरूममधून कपाटातून १८०० अमेरिकन डॉलर चोरून नेले. चोरलेल्या अमेरिकन डॉलर्सचे मूल्य भारतीय चलनात १ लाख ५१ हजार ९८५ रुपये इतके आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात घरफोडी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे पुढील तपास करत आहेत.