संग्रहित छायाचित्र
धुळे जिल्ह्यातून पुणे येथे विक्री करण्यासाठी आणलेला ५५ किलो गांजा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. यामध्ये नाशिक येथील गांजा तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी (वय ४५, रा. वडाला गाव, मदिना नगर, ता. जि. नाशिक) असे अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तपासणी करत असताना एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनचालक पिंजारी याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ५५ किलो ६९० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
गांजा, चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन असा एकूण ३२ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने, निखिल वर्षे, कपिलेश इगवे, चिंतामण सुपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केली आहे.