शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या चुहा नावाच्या गुंडाकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मेफेड्रोन, वजन काटा, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला आहे.कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. त्याच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. तौसिफ अमिर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सूरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हीड इसार (वय २९, रा. गगनगिरी मंगल कार्यालयाजवळ, धानोरी, विश्रांतवाडी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसीडन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपींचा एक साथीदार जनाब (रा. लष्कर) पसार झाला आहे. पोलीस शिपाई धनाजी धोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. चुहाविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. त्याला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. सय्यद आणि साथीदार कात्रज भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संतोषनगर परिसरात सापळा लावून त्याला पकडले.