Pune Crime : ‘रॅपिडो’च्या डिलिव्हरी बॉयने केला महिलेचा विनयभंग
‘रॅपिडो’ ॲपवरून ऑनलाईन मागवलेले हेडफोन घेण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय आयटी अभियंता तरुणीला शिवीगाळ करीत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथे घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात ‘रॅपिडो’च्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
अजित वणवे असे गुन्हा दाखल झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली असून ती मूळची अमरावती येथील राहणारी आहे. ती खासगी नोकरी करीत असून सध्या खराडी परिसरात राहण्यास आहे. ही तरुणी खराडी येथील एका ईवाय आयटी पार्कमध्ये काम करते. तिने रॅपिडो ॲपवरून एक हेडफोन मागवला होता. हा हेडफोन बाणेर येथील माउली पेट्रोलपंपाजवळून आणण्यास सांगितले होते. पीडित तरुणी १० ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास तिच्या मित्रासह जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना रॅपिडो ॲपचा डिलिव्हरी बॉय असलेल्या वणवे याने फोन केला. त्याने पार्सल आणले असून तो वडगाव शेरी येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम समोर उभा असल्याचे सांगितले. तसेच, पीडित तरुणीला पत्ता नीट टाकला नसल्याचे सांगत फोनवर शिवीगाळ केली.
पीडित तरुणी पार्सल घेण्यासाठी मित्रासह एटीएम सेंटरसमोर गेली. त्यावेळी त्यांनी आरोपीकडे पार्सल मागितले. त्याने पार्सल घेण्यासाठी उशीर झाल्याच्या कारणावरून चिडचिड सुरू केली. पार्सल हातात देत असताना फिर्यादीच्या दोन्ही हातांना पकडले. या तरुणीला त्याने स्वत:च्या अंगावर ओढून अश्लील स्पर्श करीत विनयभंग केला. तसेच, त्यांना शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून आला. त्यावेळी बरीच गर्दी जमा झाली होती. तिथे जमलेल्या लोकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी फिर्यादीचे पार्सल देऊन पसार झाला. पीडित तरुणीने रॅपिडो ॲपमध्ये त्याचे नाव पाहिले. त्यानंतर, या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे.