Pune : म्हणे, वर्षभरात एकाच सायकलची चोरी ! संख्या कमी दिसण्यासाठी पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेणेच केले बंद

पुणे शहरात सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसत असताना सायकलचोरीच्या घटनांत मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. कधीकाळी सायकलींचे शहर असलेल्या पुण्यामध्ये वर्षभरात केवळ एकच सायकल चोरीला गेल्याचे पोलिसांकडील आकडेवारी सांगते.

Pune : म्हणे, वर्षभरात एकाच सायकलची चोरी ! संख्या कमी दिसण्यासाठी पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेणेच केले बंद

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरात सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसत असताना सायकलचोरीच्या घटनांत मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. कधीकाळी सायकलींचे शहर असलेल्या पुण्यामध्ये वर्षभरात केवळ एकच सायकल चोरीला गेल्याचे पोलिसांकडील आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात गुन्ह्यांची संख्या कमी दिसावी, यासाठी पोलिसांनी सायकलचोरीचे गुन्हे दाखल करणे बंद केल्यामुळे हा दिखाऊ चमत्कार घडून आला आहे.

सायकलचोरीची तक्रार पोलीस ठाण्यात केली तर अशा गुन्ह्यांचा तपास उघडकीस येत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यातील दाखल आणि उघड गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते. साहजिकच वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याच पोलीस ठाण्यात सायकलचोरीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, येरवडा पोलीस ठाण्यात सायकलचोरीचा एक गुन्हा दाखल झाला आहे.

कामगारवर्गात आजही सायकलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही वृत्तपत्र विक्रेत्यांपासून ते कारागीर तसेच विद्यार्थी सायकलींचा प्रवासासाठी वापर करतात. व्यायामाची आवड असलेलेदेखील सायकलींचा वापर करतात. या सायकलींची किंमत सहा हजारापासून ते दीड-दोन लाख रुपयापर्यंत  असते. हीच सायकल चोरीला गेल्यावर चोरटा ती कवडीमोल किमतीत भंगारवाल्यांना विकतो. भंगारवाला काही क्षणात सायकलींचे सर्व पार्ट वेगळे करून ते पुढे विकण्यासाठी तयार होतो.

चोरीला गेलेल्या सायकलचा कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात नाही, असा पोलिसांचा अलिखित नियम आहे. त्यामुळे सायकल हजाराची असो वा लाखाची, पोलिसांच्या दृष्टीने तिची किंमत शून्य रुपये. उगाच गुन्ह्यांची संख्या वाढवायला नको म्हणून आधीच गंभीर गुन्ह्यांचा तपास करता करता मेटाकुटीला आलेले पोलीस सायकल चोरीची तक्रार करण्यासाठी आलेल्यांना तक्रार न घेता परत पाठवतात. त्यामुळे सायकल परत मिळणारच नाही, अशा विचारात तक्रारदार परत घरी येतात.

शहरात दुचाकी ठेवायला जागा नाही, म्हणून अनेकजण सायकली बाहेर जागा मिळेल तेथे लावतात. अशा सायकली चोरल्याने पोलीस काही करत नसल्याचा समज झाल्याने चोरट्यांचे फावते. त्यामुळे लहान मुलांच्या असो वा मोठ्यांच्या सायकली किंवा व्यायामासाठीच्या गिअरच्या महागड्या सायकली सर्रास चोरीला जातात, पण याची साधी दखलसुद्धा पोलीस घेत नाहीत. चोरीची सायकल शोधणे तर लांबच राहिले.

कल्याणीनगर येथील सायकलचोरीची नोंद

कल्याणीनगर येथील एका सोसायटीतील रितेशकुमार यांनी सायकल चोरीची फिर्याद दिली आहे. ॲागस्टमध्ये ही सायकल त्यांनी वाहनतळात लावली होती. सायकल व्यायामासाठी ते वापरत होते. सायकल महागडी असली तरी त्याची किंमत पोलीस ठाण्यात पंधरा हजार रुपये दाखविण्यात आली आहे. अर्थात त्याचा तपास पुढे झाला नाही, हे सांगायलाच नको.

सायकलचोरीचे गुन्हे विशेषतः दाखल केले जात नाहीत. अशा सायकली सापडत नाहीत. सापडल्या तरी त्याचा मालकाला उपयोग होत नाही. मात्र सध्या व्यायामासाठी घेतल्या जाणा-या सायकलींच्या किमती जास्त आहे. त्यामुळे वापरणाऱ्यांनी त्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

- बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest