पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहक मित्रावर कोयत्याने वार करून केली हत्या; जय मल्हार हॉटेलमधील घटना
मावळ तालुक्यातील इंदोरी परिसरात हॉटेल मालकाने ग्राहकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार अस हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हॉटेलमधील वेटर सोबत वाद झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. हॉटेल मालक अक्षय येवले याला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदोरीमधील हॉटेल जय मल्हार येथे रात्री पावणे दहा च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मावळ येथील इंदोरीमधील हॉटेल जय मल्हार येथे रात्री पावणे दहा च्या सुमारास खून झालेला प्रसाद अशोक पवार आणि त्याचा मित्र अभिषेक अशोक येवले यांनी जय मल्हार हॉटेल मधील वेटरला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर वेटर ने हॉटेल मालक अक्षय येवलेला फोन केला व झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी फोनवर प्रसाद आणि अभिषेक दोघे ही हॉटेल मालकाचे मित्र असल्याने त्यांनी भांडण करू नका, मी तिकडे येत आहे. असे सांगितले. तेव्हा फोनवरच दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर हे दोघे तिथून निघून गेले. काही वेळाने पुन्हा ते कोयता घेऊन हॉटेल समोर आले. हॉटेल मालक आरोपी अक्षय येवले हा हॉटेल बंद करत होता. तेव्हा, दोघांनी अक्षय सोबत वाद घातला. अक्षय येवले याने त्यांच्याच हातातील कोयता घेऊन दोघांवर वार केले. गंभीर जखमी असलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पैकी, प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अशोक येवले हा जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने प्रकरणी अक्षय येवले याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.