संग्रहित छायाचित्र
शहरात चंदनचोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहराच्या उच्चभ्रू भागात आणि शासकीय इमारतींच्या आवारात असलेली चंदनाची झाडे कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चंदनचोर प्रसंगी घातक हल्लेही करू लागले आहेत. अशीच एक घटना डेक्कन परिसरातील लॉ कॉलेज रस्त्यावर घडली. संशय आल्याने चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चंदनचोरट्यांनी हल्ला केला. चोरट्यांच्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ पिस्तुलामधून गोळीबार केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
चोरट्यांच्या हल्ल्यात पोलीश शिपाई तांबे जखमी झाले आहेत. डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी तांबे आणि त्यांचे सहकारी रात्र ड्यूटीवर होते. डेक्कन परिसरात ते गस्त घालीत होते. त्यावेळी पाच ते सहा जण संशयास्पदरित्या तेथून जाताना दिसले. पोलिसांना पाहताच हे चोरटे लॉ कॉलेज रस्त्यावरील गल्लीत शिरले. त्यांच्याकडे करवत, दोरखंड, हातोडा आदी साहित्य होते. या भागातील एका सोसायटीमध्ये असलेले चंदनाचे झाड कापण्यासाठी हे चोरटे जात होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला. एका चोरट्याने त्याच्याकडे असलेली करवत पोलिसांच्या दिशेने मारली. या झटापटीत ही करवत लागून तांबे यांच्या हाताला जखम झाली.
स्वसंरक्षणार्थ तांबे यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तूलामधून चोरट्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच चोरटे अंधाराचा फायदा पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी निरीक्षक गिरीशा निंबाळकर म्हणाल्या, गस्तीवर पोलिसांवर चंदन चोरांनी हल्ला केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळावरुन आरोपी पसार झाले. आम्ही त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. पोलीस कर्मचारी तांबे यांच्या हाताला जखम झाली आहे. लवकरच आरोपी गजाआड केले जातील, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, सेनापती बापट रस्त्यावरील नवराजस्थान सोसायटीच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना देखील समोर आली आहे. निलेश मकरंद उर्सेकर (वय ५०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र भिसे तपास करत आहेत.
यापूर्वीही घडल्या आहेत चंदनचोरीच्या घटना
फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यामधून चोरट्यांनी चंदनचोरी केली होती. यावेळी बंगला मालकाला मारण्याची धमकी चोरट्यांनी दिली होती. दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवीत चंदन चोरी केली होती. मागच्या आठवड्यात लॉ कॉलेज रस्त्यावरच्या एका सोसायटीमधून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले होते. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्यात आले होते. पुरालेखाभिगाराच्या आवारातील चंदनाची तीन झाडे चोरट्यांनी कापून लंपास केली होती. सुरक्षारक्षकांच्या गळ्याला चाकू लावत सात ते आठजणांच्या टोळक्याने कोरेगाव पार्कमधील सोसायटीमधून चंदनाची झाडे चोरून नेली होती. चोरट्यांनी पुन्हा त्याच सोसायटीत घुसून चंदनाची अन्य दोन झाडे तोडून नेली होती. काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाजवळील राजभवनमधून ही चंदनाची झाडे चोरून नेण्यात आली होती.