संग्रहित छायाचित्र
पुणे : मराठवाड्यातील बीड, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये दरोडे घालणाऱ्या तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी पथकाने ही कारवाई केली. या टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.
रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. वारजे माळवाडी), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. वडाळा महादेव, जि. अहमदनगर, सध्या रा. उत्तमनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील अंभोरा आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींनी दरोडा टाकला होता. याप्रकरणी दोन्ही ठिकाणी गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. दरोडा घातल्यानंतर आरोपी पसार झाले होते.
हे सर्वजण ते पुण्यामध्ये राहात होते. अंभोरा आणि पाथर्डी येथे दरोडा घातलेल्या टोळीतील आरोपी एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गस्तीवरील पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना खबऱ्यामार्फत मिळालेली ही माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांच्या पथकाने याठिकाणी सापळा लावला. संशयास्पद हालचाली दिसल्याने या तिघांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक शाहिद शेख, हवालदार धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, अजित शिंदे यांनी ही कारवाई केली.