पुणे: कुस्तीगीर होण्याच्या स्वप्नाचा अपघात; सोनू राठोडला दिली अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव टँकरने धडक

पुण्याची ओळख आता ‘ॲॅक्सिडेंट सिटी’ म्हणूनदेखील करून दिली जाऊ लागली आहे. अपघातांच्या आकडेवारीवरून या विषयीचे गांभीर्य मांडण्याचा प्रयत्न होतो. मात्र, केवळ आकडेवारीवरून अपघातांचे होणारे परिणाम अधोरेखित होत नाहीत.

संग्रहित छायाचित्र

उपेक्षित लमाण समाजातील तरुणीला कायमचे अपंगत्व येण्याची भीती

पुण्याची ओळख आता ‘ॲॅक्सिडेंट सिटी’ म्हणूनदेखील करून दिली जाऊ लागली आहे. अपघातांच्या आकडेवारीवरून या विषयीचे गांभीर्य मांडण्याचा प्रयत्न होतो. मात्र, केवळ आकडेवारीवरून अपघातांचे होणारे परिणाम अधोरेखित होत नाहीत. अपघातामुळे एखादी व्यक्ती दगावते अथवा गंभीर जखमी होते. एखाद्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व येते, याविषयी चर्चा होतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्यच अपघातामुळे बदलून जाते. त्याची उमेद मरते. अनेकदा त्याचे अवयव निकामी झाल्याने आयुष्यात अन्य काही करता येत नाही. अशीच काहीशी स्थिती शनिवारी (दि. २९) सकाळी कोंढवा येथे टँकरने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या सोनू चंद्रसिंग राठोड हिची झाली आहे. अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ती एवढी गंभीर आहे की तिला यापुढे कुस्ती खेळता येईल की नाही याची शाश्वती देता येत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणा दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तिला आयुष्यभर भोगावी लागणार आहे.

अवघ्या २० वर्षांच्या सोनू राठोड हिच्या आयुष्याची कहाणीदेखील अशीच करुण आहे. तिचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये आहे. उपेक्षित असलेल्या बंजारा (लमाण) समाजातून येणाऱ्या सोनूच्या घरात दारिद्र्य  आणि अशिक्षितपणा कायमचाच. तरीदेखील काबाडकष्ट करून या कुटुंबाने आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. सोनू आणि तिच्या भावाला आई-वडिलांनी शाळेत घातले. शालेय शिक्षण झाल्यावर तिने महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तिने बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील धानोरा येथे असलेल्या जनता वसतिगृह शिक्षण संस्था या ठिकाणी प्रवेश घेतला. सध्या ती कला शाखेच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. दरम्यान, खेळाच्या क्षेत्रात काही तरी करावे, अशी तिची इच्छा होती. गीता फोगाटसारख्या कुस्तीपटूचा आदर्श घेऊन तिने कुस्तीगीर होण्याचे ठरवले. दरम्यान, तिच्या भावाला चाकण एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी मिळाली. आई-वडील गावी मोलमजुरी करतात.

कुस्तीगीर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सोनू पुण्यात आली. हडपसरच्या हांडेवाडीजवळ असलेल्या येवलेवाडी येथील महाकाल कुस्ती संकुलात तिने प्रवेश मिळवला. संचालकांना भेटून तिने आपल्याला कुस्तीमध्ये करियर करायचे असल्याचे सांगितले. मागील दोन वर्षांपासून ती या संकुलात कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. कुस्तीचे डाव-प्रतिडाव ती शिकते आहे. यासोबतच महाविद्यालयीन शिक्षणदेखील पूर्ण करत आहे. या संकुलात कुस्ती शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता संचालकांनी पिसोळी येथील एका इमारतीमध्ये सदनिका घेऊन त्यांच्याकरिता वसतिगृह तयार केले आहे. या ठिकाणी सर्वजण राहतात. त्यांचे प्रशिक्षक किरण मोरे हेदेखील तेथेच कुटुंबासह राहण्यास आहेत.

दररोज तालमीमध्ये सराव करणारी सोनू शनिवारी सकाळी संकुलामधील अन्य मुली आणि मुलांसह व्यायामासाठी बाहेर पडली. पळण्याचा व्यायाम करीत असतानाच पाठीमागून येत असलेल्या टँकरची तिला जोरात धडक बसली. ती टँकरच्या दोन्ही चाकांच्या मध्ये अडकली होती. जोरात बसलेल्या धक्क्यामुळे ती जोरात खाली आदळली. तिच्या पाठीला जोरदार मार बसला. तिच्यासोबत असलेल्या प्रशिक्षक गीता संतोष ढुमे यादेखील या अपघातात जखमी झाल्या. गीता यांचे पती संतोष ढुमे यांनी सोनूला टॅंकरच्या खालून कसेबसे बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. तिच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून सिटी स्कॅन आदी करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये तिच्या पाठीच्या मणक्याला दणका बसला असून मणका वाकल्याचे ढुमे यांनी सांगितले. डॉक्टरांनी तिला हालचाल करण्यास मनाई केली आहे. मणका वाकल्याने तिचा पाय निकामी होऊ शकतो, असे देखील डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती संतोष ढुमे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

उपचाराचा खर्च कोण उचलणार?

एक अल्पवयीन मुलगा पाण्याने भरलेला टँकर भरधाव घेऊन निघाला होता. त्याला टँकरमालकाने टँकर दिलाच कसा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. टँकरमालक, अल्पवयीन आरोपी चालक यांच्या चुकीची शिक्षा मात्र सोनूला मिळाली आहे. उपचार घेऊन ती पूर्ण बरी झाली आणि पुन्हा कुस्ती खेळू लागली तर यापेक्षा आनंदाची बाब नाही. मात्र, जर तिला कायमचे अपंगत्व आले तर मात्र कुस्ती खेळता येणार नाही. तिच्या कुस्तीगीर होण्याच्या स्वप्नाला सध्या तरी या अपघाताने ग्रासले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे. दवाखान्याचा आणि उपचारांचा खर्च त्यांना झेपणारा नाही. त्यामुळे तिच्या उपचारांचा खर्च कोण उचलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष ढुमे हे माणुसकीच्या नात्याने सर्व धावपळ करीत आहेत. तिला चांगले उपचार मिळावे, याकरिता धडपड करीत आहेत. परंतु, त्यांनाही पुढे मर्यादा येणार आहेत. एका उपेक्षित घटकातील होतकरू महिला खेळाडूच्या स्वप्नांचाच हा अपघात घडल्याची शोकांतिका आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest