पुणे : गोळीबारातील जखमी विकी चंडालियाचा उपचारा दरम्यान मृत्यू
येरवडा : येरवडा अग्रसेन हायस्कुल येथील हॅाटल मालक विकी राजू चंडालिया याच्यावर गुरूवारी ( ता.१८) गोळीबार झाला होता. एक गोळी पोटाच्या उजव्या बाजुला कमरेच्यावर गेली होती. त्यानंतर आरोपींनी कोणत्या तरी हात्याराने विकीच्या डोक्यावर प्रहार केला होता यामध्ये विकी गंभीर जखमी त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. शविवारी ( ता. २०) रात्री चंडालियाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी त्याच्या मृतदेह तो राहत असलेल्या जय जवाननगर आण्यात आला यावेळी परिसरात तणावाचे वातावरण होते. (Yerwada Firing)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.१८) अग्रसेन हायस्कुल समोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये संशीयत आरोपी आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अभिषेक चंडालिया, संदेश जाधव, सुशांत कांबळे, संकेत तारू हे घुसले होते. हॉटेल चालक विकी चंडालिया (Vicky Chandalia) याला त्यांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आकाश चंडालिया यांनी त्याच्या जवळील पिस्तूल काढून विकीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वरती लागली. तसेच त्याने व त्याच्या साथीदारांनी विकीच्या डोक्याला कोणत्यातरी हत्याराने प्रहार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी (ता. २०) रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आकाश चंडालिया सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून सुटला आहे. तो दुहेरी खूनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आकाश व विकी हे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे आकाश यांने विकी हॉटेल चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. या बाबत विकीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर दखल घेतली गेली नाही. विकीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे आकाशने त्याच्या साथीदारांसह हॉटेलमध्ये घुसखोरी करून विकीवर गोळी झाडली होती. घटनास्थळी पोलिसांनी गोळीबारा नंतर दोन पुंगळ्या हस्तगत केल्या आहेत. अग्रसेन हायस्कूल समोरील या हॉटेल संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. याच परिसरात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून लुटमार तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी देखील झालेले आहेत.