येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील क्रांतिवीर लहुजी वस्ताद भवन चौकात रात्रभर मोठ्या प्रमाणात गांजा, अमली पदार्थांची विक्री होते.
पुणे: वस्त्यांमधील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी जसे पालक जबाबदार आहेत, तसेच राजकीय पुढारी, पोलीस हेही जबाबदार आहेत. वाढत्या व्यसनाला नेते, पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग लाभतो. वर्षभर चालणारे विविध उत्सव, थोर पुरुषांची जयंती एवढेच नव्हे तर ३१ डिसेंबर, धूळवड, गटारी अमावस्या, निवडणुका, कार्यकर्त्यांपासून नेत्यांचे वाढदिवस अशा कार्यक्रमांना पुढारी वर्गणीच्या नावाखाली कार्यकर्त्यांना लक्षावधी रुपये वाटतात. या पैशातून डीजे आणि मद्यपानाचा महापूर वाहतो. यातूनच नवीन पिढी व्यसनाच्या मार्गावर पाऊल ठेवते. हातभट्टीच्या दारूपासून ते गुटखा, गांजा अशा विविध अमली पदार्थांच्या वितरणाला पोलिसांचा वरदहस्त असतो. अशाने वस्त्यांतील व्यसनाधीनतेची कीड काही थांबत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणतात.
लोकसभा, विधानसभा असो की स्थानिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा वस्त्यांमधील मतांवर ‘डोळा’ असतो. त्यामुळे हे नेते दरवर्षी होणारे विविध उत्सव, सण, महापुरुषांचे वाढदिवस, उरुस यासाठी वर्गणीच्या नावाखाली मोठी देणगी देतात. एवढेच नव्हे तर स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठीही इच्छुक उमेदवार वस्तीपातळीवर पैशांचे वाटप करतात. सध्या शहरात तर वर्गणी देण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे स्थानिक मंडळ व कार्यकर्त्यांसह वस्त्यांमधील अल्पवयीन मुले वर्गणी मागण्यासाठी आघाडीवर असतात. त्यांना वर्गणी देण्यास नेतेही मागे-पुढे पाहात नाहीत. कारण, तो उद्याचा त्याचा मतदारराजा असतो. या वर्गणीचा हिशोब कोणी मागत नाही की धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे बंधन असते. त्यामुळे अनेकजण या पैशातून आपली ‘तल्लफ’ भागवतात.
शहरातील वस्त्यांमध्ये वर्षभर उत्सव, सण साजरे होत असतात. या सण किंवा उत्सवात हमखास डीजे वाजणार आणि डीजे आला की मद्य आले. त्यानंतर मद्य पिऊन डीजेच्या तालावर ही अल्पवयीन मुले बेभान होऊन नृत्य करतात. अशी पिढी घडविण्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते सध्या आघाडीवर आहेत. हीच मुले त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर असतात. या निवडणुकीतच अशा अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार होऊन वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात. त्यांना अटक होते. त्यांना सोडण्यासाठी हेच नेत पोलीस ठाण्यात जातात. एखादा अमूक एका नेत्याचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर शिक्का पडला की तो वस्तीचा ‘ दादा’ होतो. हाच दादा पुढे आपली टोळी तयार करतो. पुन्हा वर्षभर सण, उत्सव, उरसाच्या तयारीला लागतो. हे वास्तव शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना काम न करता पैसा मिळतो, त्यातून व्यसनही भागते. त्यातून वस्तीवर वर्चस्ववादातून गुन्हेगारी टोळ्या तयार व्हायला सुरुवात होते.
येरवड्यातील पांडू लमाण वस्ती, नाईकनगरमध्ये शंभरावर हातभट्या आहेत. अनेक वेळा त्या उध्वस्त केल्या तरी त्या पुन्हा जोमाने सुरू होतात. त्यामुळे गावठी हातभट्टी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने व्यसनाधिनता वाढत आहे.
पोलिसांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा
शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे हा कायदा व सुव्यवस्थेचा कणा आहे. ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय्‘ अर्थात ‘ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे कर्दनकाळ ’ हे पोलिसांचे घोषवाक्य आहे. मात्र, सध्या अशी स्थिती दिसत नाही. शहरातील वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातून आलेला गुटखा विकला जातो. या व्यवसायातील मोठे व्यापारी, दलालांना पोलिसांचे वरदहस्त आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय अहव्यातपणे सुरू आहे. हाच गुटखा शहरातील वस्त्यांवस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो. त्यामुळे अल्पवयीन मुले गुटख्याचे व्यसन करताना आढळतात. शाळेच्या शंभर मीटर परिसरात गुटखा, सिगारेट विक्रीला बंदी आहे. तरीसुद्धा अनेक शाळेच्या शेजारी असलेल्या पान टपऱ्यांमध्ये , दुकानात, चहाच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गुटखा, सिगारेट विकले जाते.
वस्त्या बनल्या गांजाचे आगार
शहरातील वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होते. वस्त्यांमधील अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून गांजाची विक्री केली जाते. याची सविस्तर माहिती स्थानिक पोलीस ठाण्यातील तपास पथकाला असते. एवढेच नव्हे तर पोलीसच अल्पवयीन मुलांना विक्रीसाठी प्रवृत्त करत असल्याची घटना येरवडा, विश्रांतवाडी परिसरात घडल्या आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात धानोरीतून चक्क अमली पदार्थांनी भरलेला एक टेम्पो पोलिसांनी पकडला होता. फर्ग्युसन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये भवानी पेठेतील कासेवाडीतून अमली पदार्थांचा पुरवठा झाल्याचे उघड झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये ‘वेब’चे व्यसन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘वेब’चे व्यसन लागले आहे. येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अचानक घेतलेल्या तपासणीत दप्तरात वेब मिळाल्याची माहिती प्राचार्य राहुल क्षीरसागर यांनी दिली. याबाबत लवकरच पालक सभा घेऊन पालकांना सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चार्जिंगवर चालणारे वेब विद्यार्थ्यांकडून बघून धक्का बसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.