पुणे: शहरी वस्त्यांतील गुन्हेगारीचे दुष्टचक्र - भाग २: सहज मिळतात अमली पदार्थ!

पुणे: शहरी वस्त्यांमध्ये गांजा, मद्य, एमडीसारखे अमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होतील याचे पद्धतशीर प्रयत्न होतात.  एकवेळ शुद्ध, स्वच्छ पाणी मिळणार नाही पण स्वस्त, मुबलक अमली पदार्थ हमखास मिळतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Fri, 19 Jul 2024
  • 12:28 pm
Pune, Pune Crime, Pune Drugs,  ganja, liquor, MD, Pune Slums

शिवाजीनगरमधील लोकविकास मंडळ ही स्वयंसेवी संस्था पाटील इस्टेट वस्तीत काम करते. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये व्यसनविरोधी विचार रुजावा यासाठी लघुपटाच्या माध्यमातून ही संस्था दुष्परिणामांची चर्चा घडवून आणते.

पुणे: शहरी वस्त्यांमध्ये गांजा, मद्य, एमडीसारखे अमली पदार्थ सहजपणे उपलब्ध होतील याचे पद्धतशीर प्रयत्न होतात.  एकवेळ शुद्ध, स्वच्छ पाणी मिळणार नाही पण स्वस्त, मुबलक अमली पदार्थ हमखास मिळतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. चित्रपट, वेब सीरिजमध्ये हिरो अमली पदार्थांचा सर्रास वापर करतो. त्याचा प्रभाव अल्पवयीन मुलांवर पडतो. पुरुषत्व किंवा खरा मर्द अमली पदार्थांचे व्यसन करतो, असा चुकीची समज युवकांमध्ये पसरत असल्याने त्यांच्यातील व्यसनाधीनता वाढत असल्याचे मत व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आहे.

शहरातील वस्त्यांमधील पान टपऱ्यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचा गुटखा साठा करून ठेवण्यात आलेला आहे. गल्लीबोळात गांजा मुबलक प्रमाणात विकला जातो. वस्त्यांमध्ये गुटखा, गांजा , मद्य अशा अमली पदार्थांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे  उपनगरातील वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक अमली पदार्थांची उपलब्धता वाढविली जात आहे. त्याचा परिणाम अल्पवयीन मुलांसह प्रौढ मंडळीत होऊन व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे  गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय महिलांवर घर चालविण्याची जबाबदारी पडली आहे. त्यामुळे त्या त्रस्त झालेल्या आहेत. आमची कैफियत ऐकणार कोण, असा प्रश्‍न या महिला विचारत आहेत.  

शहरी वस्त्यांमधील सोईसुविधा महापालिकेने दिल्या. त्यातच आंबेडकर -वाल्मिकी घरकुल योजना, ‘ बेसिक सर्व्हिसेस फॉर दी  अर्बन पुअर’ ( बीएसयूपी) अशा योजनेअंतर्गत शहरातील वस्त्यांमध्ये अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांचे राहणीमान सुधारले, साक्षरतेचे प्रमाण वाढले. मात्र, घरातील कर्त्या पुरुषांसोबत मुलेही व्यसनाधीन झाल्यामुळे महिलेला घर चालविणे  अवघड झाले आहे. त्यामुळे वस्त्यांमधील गरिबी, व्यसनाधीनतेचे दृष्टचक्र काही संपत नाही. कारण कमवणारे तीनजण असले तरी बाप-लेक व्यसनाधीन असल्यामुळे आईच्या तुटपुंज्या कमाईवर घर चालत आहे. त्यामुळे पैशांची बचत होत नसल्याचे लक्ष्मीनगर येथील विमल कांबळे यांनी सांगितले.  

हडपसर, रामटेकडी, वैदूवाडीत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण जास्त आहे. दिवसभर मुले रिकामटेकडी असल्यामुळे त्यांचा ‘ मोहरक्या’ त्यांना पैसे पुरवतो. त्यामुळे येथील मुलांना हातभट्टी दारूचे व्यसन लागले आहे. या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे ही मुले मोहरक्या सांगेल त्याप्रमाणे चोऱ्या करतात.  तो चाेरीचा माल मोहरक्याला देतात. लोणी, फुरसुंगी, हांडेवाडी या परिसरात हातभट्टी दारूचा व्यवसाय जोरात असल्यामुळे अल्पवयीन मुलांना सहज हातभट्टीची दारू मिळत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर माने यांनी सांगितले.


चेतन कुलकर्णी, (समन्वयक, लोकविकास मंडळ)

शहरी उपनगरातील वस्त्यांमध्ये  स्वयंसेवी संस्था काम करीत असल्यामुळे काही प्रमाणात आशेचा किरण दिसत आहे.  हडपसर, रामटेकडी येथील वैदूवाडीत व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. शाळाबाह्य मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत व महापालिकेच्या शाळेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका चालवितो. या अभ्यासिकेत इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय शिकविले जातात. त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या परिसरात ३५ अभ्यासिका सुरू असून प्रत्येक अभ्यासिकेत २५ ते ३० विद्यार्थी नियमित येत आहेत. यासह महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांना घरी कापडी पिशव्या, इतर शिवणकाम दिल्यामुळे ते मुलांकडे लक्ष देत असल्याचे लोकविकास मंडळचे चेतन कुलकर्णी यांनी सांगितले.  

शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट, औंध येथील कस्तुरबा वसाहत, गोखलेनगर परिसरात लोकविकास मंडळ कार्यरत आहेत. या परिसरात अल्पवयीन मुलांसह १८ ते ३५ वयोगटातील युवक व्यसनाधीनतेमध्ये अडकले आहेत. परिसरात लपून छपून गांजा, हातभट्टीची दारू विक्री होते. विविध लघुपटाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनविरोधी विचार रुजवत असल्याची माहिती लोकविकास मंडळाचे प्रकल्प समन्वयक अरुण निमकरडे यांनी सांगितले. येरवडा, ताडीवाला रोड परिसरातील अल्पवयीन व्यसनाधीन मुलांसाठी विविध खेळांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परिसरातील मैदानात फुटबॉल, क्रिकेट, कब्बडी अशा खेळांचे आयोजन करीत असल्याची माहिती ‘सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट ॲक्टीव्हीटी’ (सीवायडीए) चे कौस्तुभ यांनी दिली.

मुंढवा सेटलमेंट कॉलनी काळानुरूप बदलली
मुंढवा सेटलमेंट कॉलनी ब्रिटिशांनी वसविली होती. पूर्वाश्रमीत गुन्हेगारीचा ठपका  ठेऊन ब्रिटिशांनी भटक्या विमुक्तांसाठी कॉलनी निर्माण केली होती. येथील अनेकजण  २०१७ पर्यंत पाकीटमार व किरकोळ चोऱ्या करीत होते. मात्र, नोटाबंदी, एटीएमचा वापर, डिजिटल पेमेंटचा वापर, शहरभर सीसीटीव्हीचे जाळे यामुळे येथील अनेकांनी पाकीटमारी, किरकोळ चोऱ्या सोडून दिले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा वापर होत होता. मात्र, काळानुरूप येथील सर्वजण बदलले आहेत. त्यांनी चोरीचा मार्ग बदलला आहे. अनेक मुले फूड डिलिव्हरीचा व्यवसाय करतात. घरातील महिला किराणा दुकान, पालेभाज्या, फळ विक्री करीत आहेत. प्रत्येकाचे स्वत:चे घर असल्यामुळे सर्वजण सुखी समाधानी असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गायकवाड यांनी ‘सीविक मिरर’ ला दिली.

येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील वर्गांबाहेरच्या भिंती गुटखा खाऊन अशा रंगलेल्या आहेत. शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याने अनेक विद्यार्थी गुटख्याच्या आहारी गेल्याचे विदारक वास्तव या भिंती दर्शवतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest