Pune : वाहतूक पोलिसाच्या पत्नीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

जमिनीअंतर्गत असलेल्या टाकीतून पाणी काढताना पाय घसरून एका वाहतूक पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गाईंच्या गोठ्याच्या परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Pune News

संग्रहित छायाचित्र

लोणी काळभोर : जमिनीअंतर्गत असलेल्या टाकीतून पाणी काढताना पाय घसरून एका वाहतूक पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गाईंच्या गोठ्याच्या परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Lono Kalbhor) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत भाग्यश्री प्रकाश कदम (Bhagyashri Prakash Kadam)  (वय २५, रा. कदमवाकवस्ती, ता.हवेली) या मृत्युमुखी पडल्या आहेत. याप्रकरणी त्यांचे पती प्रकाश बाबूराव कदम (वय ३१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

प्रकाश कदम हे पुणे शहर पोलीस दलात गेली ९ वर्षापासून कार्यरत होते. सध्या ते विमानतळ वाहतूक विभागात कर्तव्य बजावत आहेत. प्रकाश  कदम हे पत्नी भाग्यश्री व मुलगा प्रणय (वय ४) यांच्यासोबत कदम वाक वस्ती परिसरात राहत होते. 

भाग्यश्री या नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारांस अंगणात पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा टाकीतून पाणी काढताना त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. त्यांच्या शेजारी रहात असलेल्या महिलेला भाग्यश्री यांनी नेहमीप्रमाणे अंगणात पाणी न मारल्याचे दिसले नाही. म्हणून त्यांनी भाग्यश्री यांना आवाज दिला. त्यानंतर परिसरात शोधले असता त्यांना भाग्यश्री आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पाहिले असता, त्यांना पाण्याच्या टाकीजवळ एक चप्पल व बकेट पडलेली आढळून आली. 

संशय आलेने शेजारच्या महिलेने या घटनेची माहिती ताबडतोब भाग्यश्री यांचे पती प्रकाश यांना सांगितली. त्यानंतर ते तातडीने खाली आले व पाहणी केली तेव्हा भाग्यश्री या टाकीत पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर भाग्यश्री यांना नागरिकांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढून तात्काळ लोणी काळभोर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी भाग्यश्री यांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest