पुणे: ससून रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार; बेवारस रुग्णाला डॉक्टरांनी नेऊन सोडलं निर्जनस्थळी, गुन्हा दाखल

पुणे: ससून रुग्णालयातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीला अज्ञात स्थळी फेकताना डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 24 Jul 2024
  • 11:52 am
Pune, Sassoon Hospital, sting operation, orphaned patient in a deserted place

संग्रहित छायाचित्र

प्रशासनाकडून डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

पुणे: ससून रुग्णालयातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीला अज्ञात स्थळी फेकताना डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. आदि कुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ससूनचे डीन डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाला पाहण्यासाठी ससूनमध्ये गेले असता तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात चौकशी केल्यावर ‘‘त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले, परत आणले नाही,’’ अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

 बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे, अशी माहिती गायकवाड यांना मिळाली होती. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासोबत ससून रुग्णालयाबाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार सोमवारी (दि. २२) पहाटे दीड वाजता रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचे समजून ‘‘एका रुग्णाला सोडून यायचे आहे. येणार का,’’ अशी चौकशी केली. ‘‘कुठे सोडायचे,’’ असे विचारल्यावर ‘‘इथून लांब नेऊन सोड. पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे,’’ असे उत्तर त्यांना मिळाले. त्यांनी ‘‘नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा नेऊन सोडू?  नातेवाईक सोबत पाहिजे,’’ असे सांगितल्यावर डॉक्टरांनी ‘‘तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो,’’ असे  सांगितले.

काही वेळाने डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात बसवला. त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहोचले. अंधारात आणि पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचा व्हीडीओदेखील समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे डीन डॉ. एकनाथ पवार यांची भेट घेऊन संबंधित डॉक्टरांना निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निलंबन केले नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

हे डाॅक्टर रुग्णांच्या शरीराचे अवयवदेखील विकतील...

आमदार धंगेकर म्हणाले,  ‘‘डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडून देतात. काही दिवसांनी हेच डॉक्टर रुग्णांच्या  शरीराचे अवयव विक्री करण्यासदेखील मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांचे तातडीने निलंबन झाले पाहिजे. त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. खासगी रुग्णालयातील दर परवडत नाहीत म्हणून अनेक रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात, पण सरकारी रुग्णालयात होणारी पिळवणूक, मिळणारी अपमानास्पद वागणूक वाढत चालली आहे. त्यातूनच हा निर्जनस्थळी सोडून देण्याचा प्रकार घडला आहे, जो डॉक्टरांमधील असंवेदनशीलता दाखवणारा आहे.’’

बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडून देणाऱ्या डॉक्टरांचे तातडीने निलंबन झाले पाहिजे. त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
- रवींद्र धंगेकर, आमदार

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest