पुणे: शहरी वस्त्यांतील गुन्हेगारीचे दुष्टचक्र - भाग १: वस्त्या-वस्त्यांना व्यसनाचा विळखा!

शहरीकरणाने नव्वदच्या दशकात पुणे, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढली. नव्या वस्त्यांमध्ये महापालिकेने नळाव्दारे पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे, गल्लीबोळात कॉंक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते, पददिवे अशा मूलभुत सुविधा दिल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dilip Kurhade
  • Thu, 18 Jul 2024
  • 12:44 pm

लक्ष्मीनगर पोलीस चौकीशेजारी अर्धवट बांधकाम झालेल्या या इमारतीत परिसरातील गुन्हेगारी टोळ्या मद्यपान करतात. यातूनच अनेक गुन्हेगारी कृत्यांना पाय फुटतात. जवळच पोलीस चौकी असली तरी येथे पोलीस काही कारवाई करत नाहीत.

शाळांमधील वाढत्या गळतीने विद्यार्थीदशेतच व्यसनाधिनता, गुन्हेगारीकडे पावले, पालिकेच्या शाळांत आनंददायी शिक्षणाचा अभाव

शहरीकरणाने नव्वदच्या दशकात पुणे, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढली. नव्या वस्त्यांमध्ये महापालिकेने नळाव्दारे पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृहे, गल्लीबोळात कॉंक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते, पददिवे अशा मूलभुत सुविधा दिल्या. मराठी- इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून मोफत शिक्षणाची सोय केली. शहरी वस्त्यांमध्ये डझनभर स्वयंसेवी संस्था (एनजीओ) काम करत असल्या तरी शाळा गळतीचे प्रमाण मोठे आहे. त्यातच मुलांमधील व्यसनाधिनता, गुन्हेगारी, बेरोजगारीचे दृष्टचक्र काही थांबता थांबत नाही. अशा वस्त्यांमधील सद्यस्थितीचा घेतलेला आढावा.

शहरात  ५३४  वस्त्या आहेत. यामध्ये  महापालिकेच्या  शिक्षण मंडळातर्फे तीनशे पेक्षा जास्त प्राथमिक तर २२ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व मराठी माध्यमांच्या शाळा अनुदानित असल्या तरी पालिकेने २००० नंतर विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत गेली. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांच्या कौशल्य क्षमतेच्या अभावामुळे  ते विद्यार्थ्यांना सहज आणि आनंददायी शिक्षण देण्यास कमी पडू लागले. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून सातवी, दहावीनंतर शाळा गळतीचे प्रमाण अधिक वाढले आहे.
शहरी वस्त्यांमधील महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळा विद्यार्थी संख्या काही प्रमाणात असल्याने त्या टिकून आहेत. मात्र, आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली. त्यांना नीट वाचता येत नव्हते कि गणितातील आकडेमोड  जमत नाही. त्यामुळे आठवी नंतर शाळा गळतीचे प्रमाण अधिक वाढले.  पालकांचे विद्यार्थ्यांकडे असलेले दुर्लक्ष किंवा पालकच व्यसनाधिनतेमध्ये असल्यामुळे त्यांची मुले  सहाजिकच  व्यसनाधिनतेकडे वळली. थोडक्यात या वस्त्यांना व्यसनांचा विळखा पडला आहे.  

अल्पवयीन मुली गुन्हेगारीत 
वस्त्यांमधील गरीब, सुंदर विद्यार्थींनींना हेरून त्यांना पैशाचे आमिष देऊन गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात आणले जात आहे. त्यासाठी अनेक महिला दलाल कार्यरत आहेत. याचा थांगपत्ता ना स्थानिक पोलीसांना आहे ना लोकप्रतिनिधींना. गुन्हेगारी मुलींना पैसे, महागडे मोबाईल, अमली पदार्थ देऊन त्यांना आपल्या टोळीत सहभागी करून घेतात. त्यांच्या मार्फत अमली पदार्थ पोचविण्याचे नेटवर्क तयार करतात. त्यामुळे कोणालाही  त्यांचा संशय येत नाही.  

शाळेज‌वळ पान-टपऱ्या
शहरातील दाट लोकवस्तीमुळे वस्त्यांची सीमारेषा आणि शाळांची सीमारेषा कळत नाही. त्यामुळे शाळेच्या अगदीलागून अनेक पान टपऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज गुटखा, सिगारेट आणि तंबाखु उपलब्ध होतेच असे नाही तर उपलब्ध करून दिले जाते असे म्हणावे लागले. त्यामुळे अनेकांना विद्यार्थीदशेतच गुटखा, सिगारेट व तंबाखुचे व्यसन लागते. वस्त्यांमध्ये गल्ली बोळात आता गांजा मिळत असल्यामुळे गुटखा, सिगारेटची जागा गांजाने घेतली आहे. शाळा गळतीचे वाढते प्रमाण , मुलांमधील व्यसनाधिनतेचा, बेरोजगारीचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार टोळ्या अशा मुलांना लक्ष करून त्यांना टोळीमध्ये सहभागी करून घेत आहेत. त्यामळे वस्त्यांमधील अनेक अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी गेले आहेत. अनेकजण उदरनिर्वाहसाठी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये राहत आहेत. वस्त्यांमध्ये संघटीत गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे.

चेल्यांची वस्तीत दहशत
येरवड्यातील अनेक गुन्हेगारी टोळीचे प्रमुख येरवडा कारागृहात आहेत. मात्र, त्यांची अल्पवयीन गुन्हेगार मुले वस्त्यांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये  गुंतले आहेत. अमली पदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. यामध्ये दलाल महिला वस्त्यांमधील गरीब, गरजू विद्यार्थींनींना जाळ्यात अडकवत असल्याचे समोर आले आहे. त्या दृष्टीने तपास करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी  केली आहे.

‘‘ शहरातील वस्त्यांमध्ये व्यसनाचा विळखा पडला आहे. मुला-मुलींचे पालक दोघेही कामाला जातात. त्यामध्ये किशोरवयीन मुलींच्या शारिरीक, मानसिक बदल होताना त्यांच्या आईची सोबत मिळत नाही. अशा मुलींना मैत्रिण किंवा मित्राची वाईट संगत मिळाल्यास ते पैशाच्या किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात. याचे भयावह वास्तव वस्त्यांमध्ये सध्या दिसत आहे. त्यावर वेळीच उपायोजना करण्याची गरज आहे.’’
- विजय शिवले, प्रमुख, सुराज्य सर्वांगिण विकास संस्था,

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest