संग्रहित छायाचित्र
पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाने भागीदारासोबत असलेल्या आर्थिक वादामधून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना धायरी परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी संबंधित भागीदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
किशोर मनोहर बेट्टीगिरी (वय ५२, रा. पद्मनाभ बंगला, रायकरनगर, धायरी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे भागीदार सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे, सागर सुरेंद्र लायगुडे (तिघेही रा. धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सविता किशोर बेट्टीगिरी (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेट्टीगिरी कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील आहे. मागील अनेक वर्षांपासून बेट्टीगिरी कुटुंब सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात वास्तव्यास आहे. हे सर्वजण पुण्यातच स्थायिक झालेले आहेत.
फिर्यादीनुसार, बेट्टिगिरी आणि सुरेंद्र लायगुडे यांनी भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरु केला होता. धायरीमधील बारंगिणी मळा येथे ‘राजवीर ॲव्हेन्यू’ या गृहप्रकल्पाचे काम त्यांच्या भागीदारीमधून सुरू झाले होते. स्वाती कन्सलटन्सीकडून संग्राम लायगुडे, त्याचा भाऊ सागर या दोघांनी बेट्टीगिरी यांना ९१ लाख रुपये दिले होते. बेट्टीगिरी यांनी त्यामधील ८० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर, उर्वरित पैशांसाठी आरोपींनी बेट्टीगिरी यांच्याकडे तगादा लावला. याच वादामधून लायगुडे यांनी बेट्टीगिरी भागीदार असलेल्या गृहप्रकल्पाचे काम दोन ते तीन वेळा बंद पाडले होते. संग्राम आणि त्याचा भाऊ सागर यांनी या गृहप्रकल्पातील दोन व्यावसायिक गाळे देखील ताब्यात घेतले होते.
उर्वरित पैसे देणे जमत नसेल तर, जीव दे, अशी धमकी लायगुडे यांनी बेट्टीगिरी यांना दिली होती. या धमकीमुळे ते नैराश्यात गेले होते. याच नैराश्यातून बेट्टीगिरी यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे. बेट्टीगिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.