संग्रहित छायाचित्र
ऑर्डर दिल्यापेक्षा मद्याचा वेगळा ब्रँड आणि बिलात दाखवल्यापेक्षा मद्य कमी प्रमाणात दिल्याच्या कारणावरून वाद घालणाऱ्या ग्राहकांचा पाठलाग करून विमाननगर येथील एका पबच्या मालकाने त्यांना गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
विमाननगर येथील ‘बाॅटल बॅश’ पबमध्ये बुधवारी (दि. १५) रात्री दीडच्या सुमारास दोन ग्राहकांनी मद्यपानाची मागणी केली. वेटरसह पबमालकाने त्यास नकार दिला. ग्राहकांनी जास्तच आग्रह केल्यामुळे त्यांना मद्य दिले. मात्र, ऑर्डर दिलेल्या मद्याचे ब्रँड आणि मापात पाप झाल्याची तक्रार करीत ग्राहकांनी बिल देण्यास टाळाटाळ केली. सुरुवातीला ग्राहकांनी दमबाजी केली. मात्र, नंतर त्यांनी ऑनलाईन पेमेंट केले. ते दुचाकीवरून घरी जात असताना पबमालकाने पबमधील कर्मचाऱ्यांना घेऊन मोटारीने त्यांचा पाठलाग केला. मोटारीने दुचाकीला धडक देऊन त्यांना पाडले आणि त्यानंतर लाथाबुक्यांनी जबर माहरण करून गंभीर जखमी केले. ससून रुग्णालयाचे मेडिकल सर्टिफिकेट असतानासुद्धा विमानतळ पोलीस गेली दोन दिवस तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे कमलेश चाबुकस्वार आणि अतुल गडकरी यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
विमाननगर येथील ‘बॉटल बॅश’ पबमध्ये १५ मे च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास कमलेश चाबुकस्कवार आणि अतुल गडकरी हे दोघे मद्यपानासाठी गेले होते. तेथे त्यांनी टकाटक या ब्रँडचे मद्य मागितले. मात्र, वेटरने त्यांना वोडका पॅक दिला. हा पॅक तीस मिली की साठ मिली, याबाबत त्यांना सांगितले नाही. दोघांनी दोन पॅक घेतले. त्यानंतर चाबुकस्वार आणि गडकरी यांनी बिल देण्यास नकार दिला. मागितलेला ब्रँड आणि योग्य मापात मद्य न दिल्याने ते वाद घालू लागले. दमबाजी करीत शेवटी त्यांनी १,३०० रुपये ऑनलाईन पेमेंट केले.
चाबुकस्वार आणि गडकरी हे दुचाकीवरून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. याचवेळी पबच्या मालकाने मोटारीत चार ते पाच जणांना घेऊन त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीला मोटारीने धडक देऊन पाडले. त्यानंतर मालकासह चार ते पाच जणांनी चाबुकस्वार व गडकरी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये चाबुकस्वार बेशुद्ध पडला तर गडकरीच्या नाका तोंडातून रक्तस्राव होऊ लागला.
थोड्या वेळेने दोघेही कसेबसे विमाननगर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे गेल्यावर दोघांनी ठाणे अंमलदारांना घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यावेळी पोलिसांनी ससूनचे मेडिकल सर्टीफिकेट आणण्याचे त्या दोघांना सुचवले. दोघेही ससूनमध्ये उपचार घेऊन तेथील डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेऊन आले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना सर्व हकिगत सांगितली. खोबरे यांनी पबच्या मालकाला बोलावून घेतले. समोरासमोर घडलेल्या घटनेची शहानिशा केली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल केला नाही. पब मालकाने ग्राहकांना ‘दहा हजार रुपये घ्या तक्रार मागे घ्या,’ अशी विनंती केली. मात्र, चाबुकस्वार व गडकरी यांनी तक्रार करणारच, अशी भूमिका घेतल्याचे समजते.
पब आणि हॉटेल रात्री दीडनंतरही सुरू
पुणे शहर व उपनगरातील सर्व हॉटेल आणि पब हे रात्री एक वाजता बंद होतील, असा आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. तरीसुद्धा कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, खराडी परिसरात रात्री दीडनंतरसुद्धा पब तसेच हॉटेल सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असतात.
पब मालक व ग्राहकांमध्ये समझोता झाला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला गेला नाही. पोलीस ठाण्यात नंतर काय झाले माहीत नाही.
- आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे