संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर येथे पोर्शे स्पोर्ट्स कारने चिरडल्यामुळे संगणक अभियंता अनीश अवधानी, अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. यामध्ये कारचालक अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी सुधारगृहात झाली आहे. घटना गंभीर असल्यामुळे अल्पवयीन आरोपीला प्रौढ दाखविण्याचा निर्णय प्रलंबित आहे. तसेच हा अपघात सदोष मनुष्यवध असल्यामुळे घटनास्थळावरील पुरावे महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे गुरुवारी (दि. २३) न्यायवैधक प्रयोगशाळेने अपघातातील पोर्शे स्पोर्ट्स कारची संपूर्ण तपासणी केली.
कल्याणीनगर येथे रविवारी (दि. १९) मध्यरात्री पोर्शे स्पोर्ट कारने दुचाकीला जोरात धडक दिली होती. त्यामुळे संगणक अभियंते अनिश अवधानी आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला होता. यामधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे सुरुवातीला त्याला जामीन मंजूर झाला. मात्र, जनतेच्या रेट्यामुळे त्याचा जामीन नामंजूर झाला. अल्पवयीन आरोपीचे वय १७ वर्षे ८ महिने आहे. हा अपघात सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली येतो. त्यामुळे आरोपीला प्रौढ समजायचे का, या बाबतचा निर्णय व युक्तिवाद न्यायालयात होणार आहे. मात्र, तत्पूर्वी या अपघातातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी गुरुवारी न्यायवैधक प्रयोगशाळेने येरवडा पोलीस ठाण्यात आणलेल्या पोर्शे स्पोर्ट्स कारची बारकाईने तपासणी केली. यासह महत्त्वाचे पुरावेही गोळा केल्याचे अधिकृत सूत्रांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. (Pune Porsche Accident)
हे सर्व पुरावे न्यायालयात महत्त्वाचे ठरणार असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा अपघात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी उपयोगी पडू शकतो. न्यायवैधक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी पोर्शे स्पोर्ट्स कारने ज्या दुचाकीला जोरात धडक दिली होती त्यामुळे कारचा रंग उडाला आहे का ? अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. त्यामुळे त्याचे कपडे किंवा केस चालकाच्या सिटवर पडले आहेत का? कारने ब्रेक मारले असल्याने त्याचे रस्त्यावरील मार्क किंवा टायरला लागले आहे का? या मार्कवरून कारचा स्पीड काढला जाऊ शकतो. त्यामुळे वरील गोष्टींची बारकाईने तपासणी करण्यात आली.
तपासणी सुरू असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना छायाचित्रे तसेच चित्रीकरणास पोलिसांनी मज्जाव केला. एक वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराने न्यायवैधक प्रयोगशाळेतील अधिकारी पाहणी करीत असतानाचे छायाचित्र काढले. ते पाहून साहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे छायाचित्रकारावर भडकल्या. त्यांनी येरवडा तपास पथकातील अधिकाऱ्यांकडून चक्क छायाचित्र डिलिट करायला भाग पाडले. पुणे शहराच्या इतिहासात आतापर्यंत अपघात झालेल्या वाहनाची काळजी घेतली गेली नाही. मात्र, अडीच कोटींच्या पोर्शे स्पोर्ट्स कारला पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा नष्ट होईल म्हणून कव्हरने झाकून ठेवले. (Kalyani Nagar Accident)
रक्त तपासणीला एवढा विलंब आश्चर्यकारक
कोणत्याही गुन्ह्यात पोलिसांनी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविलेले रक्त नमुन्यांचे विश्लेषण दुसऱ्या दिवशी होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या रक्ताचा प्रयोगशाळेतील अहवाल तयार होतो. जास्तीत जास्त पाच दिवसात संबंधित पोलीस ठाण्यात रक्त तपासणीचा अहवाल जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे रक्ताच्या तपासणीला एवढा अवधी लागणे आश्चर्यकारक असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर न्यायवैधक प्रयोगशाळेतील एका निवृत अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला सांगितले.