फोटो: परसबागेत मुले काम करताना आणि डॉ. अजय दुधाणे
शहर, उपनगरात किरकोळ गुन्ह्यांपासून ते गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपनगरात शाळा गळतीचे वाढते प्रमाण, बेरोजगारी, व्यसनाधिनतेमुळे ते गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतात. यापैकी अनेक मुलांची रवानगी सुधारगृहात केली जाते. तेथे केवळ त्यांचे पोषण होते. खेळ व व्यावसायिक कौशल्ये अपवादात्मक शिकविली जातात. मात्र, त्यांना मानसिक स्वास्थासाठी समुपदेशनासह औषधोपचाराची गरज असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘सीविक मिरर’कडे व्यक्त केले आहे.
अल्पवयात हातून किरकोळ, गंभीर गुन्हा झालेल्या मुलांना ‘विधी संघर्षित बालक’ संबोधले जाते.पुणे जिल्ह्यात येरवड्यात विधी संघर्षीत मुलांसाठी पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात बाल सुधारगृह आहे. राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी निरीक्षणगृहे आहेत. ही निरीक्षणगृहाची जबाबदारी राज्याच्या महिला- बाल विकास आयुक्तालयाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्ह्यातील सुधारगृहातील व विशेष निरीक्षणगृहातील दैनंदिन कामकाज पाहतात. मात्र, येथील मुलांच्या पोषणासह काही प्रमाणात खेळ, व्यावसायिक कौशल्यांची धडे दिले जातात. यामध्ये ही मुले रमत नाहीत. अशा मुलांना समुपदेशनासह औषधोपचाराची गरज असल्याचे मत व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांचे आहे.
गेल्या वर्षाभरात बाल सुधारगृहात एकूण तीनशे मुलांना दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा खून ,खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी सारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी आहे.गेल्या काही काळापासून विधी संघर्षीत मुलांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे निरीक्षण आहे. बाल सुधारगृहात काही काळ ठेवल्यानंतर बाल न्यायालयाच्या आदेशांने मुलांना मुक्त केले जाते. बाहेर पडल्यावर मुले पुन्हा वाईट संगती आणि व्यसनामुळे पुन्हा गुन्हेगारी विश्वाकडे वळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विधी संघर्षीत मुलांना सुधारगृहातच समुपदेशनासह औषधोपचार करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांची व्यसनमुक्ती होऊन शकते. यासह समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविता येऊ शकते, असे व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणा-या संस्थांनी सांगितले.
गरिबी,अशिक्षितपणा,मित्रांची वाईट संगत,व्यसनाधीनता आणि इतर कारणांमुळे वस्त्यांमधील मुले गुन्हेगारीकडे वळतात. त्यांच्या हातून गुन्हा घडून जातो. ही मुले सुधारगृहात दाखल झाल्यावर त्यांचे मानसिक स्वास्थासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत, असे मत पंडित जवाहरलाल नेहरू आद्योगिक शाळा व सुधारगृहाच्या माजी अधिक्षकांनी व्यक्त केले.
टोळ्यांच्या आश्रयाला
शहरातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या आश्रयाला वस्त्यांमधील गरीब, शाळासोडलेले, व्यसनाधिनतेमध्ये अडकलेली मुले आहेत. त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या टोळीत सहभागी करून घेतला जातो. त्यानंतर त्यांचा वापर किरकोळ गुन्ह्यांपासून ते मोठ्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापर केला जातो. अशा मुलांना जणू प्रशिक्षणच दिले जाते.
सुधारगृहातील मुलांना समुपदेशनासह औषधोपचाराची गरज आहे. तरच ही मुले व्यसनमुक्त होतील. त्यानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना व्यावसायिक कौशल्य दिले पाहिजे. चांगला नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- डॉ. अजय दुधाणे, आनंदवन व्यसननुक्ती केंद्र