पुणे: पती निघाला ‘गे’...; महिलेची पोलिसांकडे तक्रार

पुणे : लग्नानंतर आपला पती ‘गे’ असल्याची धक्कादायक माहिती पत्नीला समजली आणि तिला धक्का बसला. तरीदेखील दोन वर्ष कसाबसा संसार केल्यानंतर देखील सासरच्या व्यक्तींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

संग्रहित छायाचित्र

मुंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : लग्नानंतर आपला पती ‘गे’ असल्याची धक्कादायक माहिती पत्नीला समजली आणि तिला धक्का बसला. तरीदेखील दोन वर्ष कसाबसा संसार केल्यानंतर देखील सासरच्या व्यक्तींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी पिडीत महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते १७ एप्रिलपर्यंत घडला. 

याप्रकरणी ३३ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला मुंढवा परिसरात राहण्यास आहे. तिचा ३० वर्षीय पती, ६४ वर्षीय सासू, ४० वर्षीय नणंदेविरुद्ध भादवि ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वानवडी येथील एका आलीशान सोसायटीत घडला. पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न जानेवारी २०२२ मध्ये झाले होते. तिचे सासर कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यात आहे. लग्न करीत असताना महिलेपासून त्यांचा पती ‘गे’ असून त्याला पुरुषांमध्ये रस असल्याची माहिती लपवून ठेवण्यात आली. तसेच त्याची समाजात ‘गे’ म्हणून ओळख निर्माण होऊन बदनामी होऊ नये याकरिता फिर्यादीसोबत लग्नाचे नाटक केले.  (Pune Crime News)

यासोबतच या महिलेला घरातील सर्व कौटुंबिक खर्च करायला भाग पाडले. आरोपी पतीने त्याच्या आईचा देखील खर्च करण्यास भाग पाडले. या महिलेला शरीरसुखापासून वंचित ठेवल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, किरकोळ कारणावरून फिर्यादीला हाताने मारहाण करण्यात आली. तसेच, वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. सासू आणि नणंदेने या महिलेला ‘आम्हाला तुझ्यापेक्षा श्रीमंत घरातील ४० तोळे सोने देणारी सून मिळाली असती. तुझ्या मुळे माझ्या मुलाचे आयुष्य खराब झाले.’ असे म्हणत सतत टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest