संग्रहित छायाचित्र
पुणे : केवळ हॉर्न वाजवल्यामुळे चिडलेल्या बापलेकाने एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंढवा येथे घडली. या हल्ल्यात दोन महिलांना देखील फायटरने मारहाण करण्यात आली. यासोबतच त्यांच्या गाडीवर मोठा दगड मारून नुकसान करण्यात आल्याचे जखमींनी सांगितले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
राजेश नाथोबा वाघचौरे (वय ५०), सुवर्णा राजेश वाघचौरे, संस्कृती राजेश वाघचौरे (सर्व रा. कोरेगाव पार्क) अशी जखमींची नावे आहेत. शुभम गायकवाड व त्याचे वडील राजू गायकवाड नावाच्या तरूणांविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांनी फायटर सारख्या हत्याराने व शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर वाघचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारून काच फोडण्यात आली. राजेश यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलगी संस्कृती व पत्नी सुवर्ण यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. तसेच, बुक्के मारून जखमी करण्यात आले. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.