उसने पैसे परत न केल्याने सहकाऱ्यानेच केला तरुणीचा खून, कंपनीच्या पार्किंगमध्ये केला वार
पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या डब्लू.एन.एस. या कंपनीत काम करणाऱ्या एक तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. शुभदा शंकर कोदारे (वय-२८, रा. कात्रज,पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी मृत्यू झालेल्या तरुणीची बहीण साधना शंकर कोदारे (वय-२६,रा. काळेवाडी फाटा, पिंपरी चिंचवड) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय-२८,रा. शिवाजीनगर, पुणे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलिसांनी कनोजा याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मृत्यू झालेली तरुणी ही मुळची कराड येथील होती. तर आरोपी कृष्णा कनोजा हा उत्तरप्रदेशातील आहे. येरवडा परिसरातील डब्लू.एन.एस. कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये हे दोघेही कामाला होते. दोन वर्षांपूर्वी शुभदा हिने आरोपीकडून पैसे उधार घेतले होते. त्यानंतर कनोजा याने वारंवार तिच्याकडे पैसे मागितले. मात्र तिने पैसे देण्यास टाळाटाळ केली. या रागातून कृष्णा याने तिच्यावर किचन नाईफने कंपनीच्या पार्किंगमध्ये वार केला. त्या वारामुळे शुभदाच्या उजव्या हाताच्या कोपरावर गंभीर जखम झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
शुभदा हिला तातडीने येरवडा येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.