संग्रहित छायाचित्र
पुणे : एका ८६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या रागातून नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याची घटना भारती हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय ३६) यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकूण सहा जणांवर महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये ८६ वर्षीय तेजराज जैन यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जैन यांच्या नातेवाईकांनी सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच रुग्णलायातील कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना धक्काबुक्की केली.
तसेच, त्यांनी रुग्णालयात आरडाओरडा केला. तसेच एक लाडकी स्टूल रुग्णालयातील केबीनच्या काचेवर फेकून मारला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस पुढील तपास करत आहेत.