संग्रहित छायाचित्र
पुणे : पत्नी व सासरच्या व्यक्तींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम (वय ३२, रा. सत्यम राजयोग सोसायटी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कदम यांचे वडील हरिश्चंद्र गोविंद कदम (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे. प्रफुल्लची पत्नी, सासू, मेहुणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल यांची सासू आणि मेहुणी चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर भागात राहायला आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्लचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच त्याला पत्नीने त्रास देण्यास सुरुवात केली. सासू आणि मेहुणीने त्यांचा मानसिक त्रास देण्यासोबतच संसारात ढवळाढवळ सुरू केली. ‘तुम्ही आम्हाला फसवले आहे. तू मेला तर मी दुसरा विवाह करुन सुखी राहिल, असे पत्नी त्यांना वारंवार म्हणत असे. त्यांना सातत्याने टोमणे मारणे, शाब्दिक त्रास देणे सुरू होते. या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी धानोरी मधील राहत्या घरी ३१ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये पत्नी, सासू, मेहुणीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांच्या वडिलांनी हरिश्चंद्र यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत.
यापूर्वी घडलेल्या घटना
१. पत्नीच्या विवाहबाह्य संबंध आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून नैराश्यात गेलेल्या सोपान धोंडीबा केंद्रे (रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ६ एप्रिल २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी पत्नी भाग्यश्री सोपान केंद्रे (रा. कंधार, नांदेड), मधुकर अंबाजी केंद्रे (वय ३५, रा. कंधार, नांदेड) या दोघांवर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी रंभाबाई धोंडीराम केंद्रे (व्यय ६५) यांनी फिर्याद दिली आहे.
२. पत्नी आणि सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. नसरापूर, ता. भोर) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. ही घटना बिबवेवाडी येथील लोअर इंदिरानगर येथे ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पत्नी ऐश्वर्या विजय चाळेकर, सासरे विजय नामदेव पिंगळे, सासू शीतल विजय पिंगळे (सर्व रा. पौड, ता. मुळशी), हृषीकेश ऊर्फ भाई सुनील खेडकर, सुनील शिवलिंग खेडकर, भूषण सुनील खेडकर (रा. नसरापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तेजसची आई शिला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापुर, ता. भोर) यांनी फिर्याद दिली होती.