Financial Fraud | ‘एमएनजीएल’च्या नावाने फसवणूक, व्यावसायिकाला घातला तब्बल १८ लाखांचा गंडा...

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) नावाने ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ग्राहकांना फोन करुन अथवा मेसेजद्वारे ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरण्यास सांगितले जात आहे.

Financial Fraud,

प्रातिनिधिक छायाचित्र....

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) नावाने ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ग्राहकांना फोन करुन अथवा मेसेजद्वारे ‘मोबाईल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरण्यास सांगितले जात आहे. पैसे न भरल्यास गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती देखील घातली जात आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाला गॅसचे बील भरले नसल्याचा मेसेज पाठवित तब्बल १८ लाख २५ हजार ५९३ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या फसवणुकींबाबत ‘एमएनजीएल’ने वारंवार आवाहन केल्यानंतर देखील सायबर चोरटयांच्या ठगबाजीला ग्राहक बळी पडत असल्याचे चित्र आहे.

देवेश जोशी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हर्षकुमार जैन (वय ७४, रा. निओ टॉवर्स, अमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३१९ (२), ३१८ (४), आयटी अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार २१ डिसेंबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीदरम्यान घडला. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षकुमार जैन हे त्यांच्या मुलाकडे राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा अमेनोरा पार्क येथे एका सदनिकेत भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्यांना २१ डिसेंबर रोजी त्यांच्या मुलाने एक टेक्स्ट मेसेज केला. त्यामध्ये एमएनजीएलचे बील थकीत असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. त्या मेसेज सोबत एक लिंक देखील देण्यात आलेली होती. सदनिका मालकाला हा मेसेज आलेला होता. त्याने हा मेसेज जैन यांच्या मुलाला पाठवला. त्यांच्या मुलाने तो तसाच पुढे फिर्यादी यांना पाठवला. 

हा मेसेज वाचल्यानंतर फिर्यादी यांनी त्यामधील लिंकवर क्लिक केले. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘एपीके’ फाईल ओपन झाली. त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांनी सर्व माहिती भरली. त्यानंतर, त्यांना एकामागे एक असे ओटीपी येत गेले. तसेच, त्यांच्या खात्यावरून पैसे देखील कमी होत गेले. या व्यवहारांबाबत त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी बँकेला आणि मुलाला माहिती कळवली. आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, ‘एमएनजीएल’कडून याविषयी जनजागृती करणारे मेसेज पाठविले जात आहेत. ‘आम्ही ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे बिले भरण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणतीही सुविधा प्रदान केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट किंवा फसव्या कॉल्सवर विश्वास ठेवू नये. एमएनजीएलकडे फेक कॉल्स आणि मेसेजसंदर्भात तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. ग्राहकांनी सतर्क राहावे, तसेच फसव्या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन एमएनजीएलकडून करण्यात आले आहे.

Share this story

Latest