पुणे : दांडियाच्या कार्यक्रमात नाचवले कोयते
दांडिया पाहायला गेलेल्या एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करीत त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना कात्रज येथील संतोषनगर परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दांडियाच्या कार्यक्रमात कोयते नाचवल्याने कार्यक्रमासाठी आलेले नागरिक आणि भाविक घाबरले. अनेकजण घाबरून पळून गेले.
अमीत चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या आणखी तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) या तरुणाने फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात मोरे हा जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्याच्या मामाचा मुलगा मंगळवारी रात्री संतोषनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी जुन्या भांडणामधून सराईत गुन्हेगार असलेल्या अमित चोरगे आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांना पाहिले. दोघांना गाठत दांडियाच्या ऐन कार्यक्रमात कोयते उगारून दहशत माजवण्यास सुरुवात केली.
टोळक्याच्या हातांमधील कोयते पाहून दांडियाच्या कार्यक्रमासाठी आलेले नागरिक आणि भाविक घाबरले. अनेकजण घाबरून तेथून पळून गेले. दरम्यान, मोरे आणि त्याचा मामेभाऊदेखील तेथून निसटले. मात्र, पळून जात असताना मोरे पाय अडखळून खाली पडला. त्यावेळी चोरगे आणि साथीदारांनी त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यात, हातावर, चेहऱ्यावर आणि शरीरावर वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून सर्वजण पसार झाले. दरम्यान, जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेटे करीत आहेत.
यासोबतच दांडिया खेळताना झालेल्या वादामधून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची दुसरी घटना घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद देवेंद्र मांगले (वय ४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्व रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बी. टी. कवडे रस्त्यावर असलेल्या शिव मित्र मंडळाने दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जुन्या वादामधून आरोपींनी राजवर्धन नुगला या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मांगले यांना आरोपींनी मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे करीत आहेत.