बाणेर टेकडीवर नागालँड मधील तरुणींना लुटणारा चोरटा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात
बाणेर टेकडीवर फिरायला गेलेल्या नागालँड मधील तीन तरूणींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लुटून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यासोबतच पोलिसांनी त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. द्रापेत उर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. बोराडेवाडी, चिखली, मूळ रा. लातूर जिल्हा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.
१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बाणेर टेकडीवर अबिनीयू खांन्गबुबो चवांग (वय ३६, सध्या रा. रोहन निल सोसायटी, बाणेर) तिच्या मैत्रिणी चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई फिरायला गेल्या होत्या. यावेळी आरोपी द्रापेत उर्फ विशाल समुखराव आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी तिघींना कोयत्याचा धाक दाखवून लुटले. त्यांना शिवीगाळ करुन लोखंडी हत्याराने मारहाण देखील केली. त्यांच्याकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, इअर बड्स, पिशवी असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेऊन पळून गेले. घाबरलेल्या तिघींनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी तपास सुरू केला. गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना आरोपीची माहिती प्राप्त झाली. आरोपीचा मोटार सायकल वर पाठलाग करून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. दाखल गुन्ह्यात त्याला अटक करून त्याच्याकडून जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेलेल्या वस्तु तसेच मोटार सायकल व लोखंडी धातुचा कोयता असा १ लाख १० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयानंद पाटील, उपनिरीक्षक प्रवीण चौगले, हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के यांनी ही कारवाई केली.