संग्रहित छायाचित्र
पुणे : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीत शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करीत त्याच्याशी शाळेमध्येच लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने बंद असलेली शाळेमधील खोली उघडून पाहिली तेव्हा खोलीत शिक्षिका आणि विद्यार्थी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे दिसले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकेने त्याला लैंगिक भुरळ घालून शरीरसंबंध करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी शाळेच्या ३५ वर्षीय मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,२७ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम ७, ९ (फ), ११ (६), १२, १४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी या शाळेमध्ये तीन वर्षापासुन मुख्याध्यापिका म्हणून काम करीत आहेत. या शाळेत इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतची मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये दैनंदिन स्वरूपात शिक्षक, इतर कामगार वर्ग, विद्यार्थी असे उपस्थित असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. शाळेमध्ये मुलांसाठी लैंगिक अत्याचारांबाबत जागृती करण्यासाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयासंबंधी शाळेतील समुपदेशक समुपदेशन करीत असतात. त्यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी, मुले व मुली हे सहभागी होत असतात.
सध्या या शाळेमध्ये परिक्षा सुरू आहेत. शुक्रवारी (२७ डिसेंबर) रोजी साधारण पावणेअकराच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण मार्गदर्शक असलेले एक शिक्षक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर गेलेले होते. या मजल्यावरील एक खोली बंद होती. परीक्षा कालावधी असतानादेखील या मजल्यावरील खोली बंद कशी काय असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी या खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना शाळेमधील इयत्ता १० वी मध्ये शिकणारा १७ वर्षांचा एक विद्यार्थी आणि शाळेतील एक महिला शिक्षिका हे दोघेही विवस्त्र अवस्थेत असल्याचे दिसले. ते दोघेही जमिनीवर शरीर संबंध करीत असताना आढळून आले.
हे दृश्य पाहताच या शिक्षकाला धक्का बसला. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत मुख्याध्यपिकेकडे धाव घेत घडला प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने खात्री करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा, संबंधित मुलगा व महिला शिक्षिका हे दोघेही या खोलीमध्ये जात असल्याचे दिसले. ही बाब त्यांनी संस्थेच्या संचालकांना फोनद्वारे कळविली. त्या तात्काळ शाळेत येण्यास निघाल्या.
मुख्याध्यापिकेने याविषयी संबंधित शिक्षिकेकडे एका स्वतंत्र खोलीमध्ये नेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी महिला उपप्राचार्या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी संबंधित महिलेले घडलेला प्रकार सत्य असल्याची कबुली दिली. परंतु, आपण संपूर्ण विवस्त्र अवस्थेत नव्हतो तर अर्धनग्न स्थितीत होतो असे सांगितले. तसेच, या प्रकारामागील कारण विचारले असता तिला आणि संबंधित विद्यार्थ्याला एकमेकांबाबत आकर्षण असल्याचे सांगितले. तसेच, हा मुलगा एकदा शाळेत आलेला नव्हता. त्यामुळे त्याला ही शिक्षिका भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी देखील त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक निर्माण झाली होती असे सांगितले.
त्यानंतर, संबंधित विद्यार्थ्याकडे देखील स्वतंत्र खोलीमध्ये मुख्याध्यापिका आणि उपप्राचार्या याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने दोन दिवसांपुर्वी या शिक्षिकेला फोन करून त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. परंतु, या शिक्षिकेने त्याला हा प्रकार चुकीचा असल्याची समज दिली होती. मात्र, तो एकदा घरी एकटाच असताना ही शिक्षिका घरी आली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक झाल्याचे सांगितले. हा प्रकार सत्य असल्याची खात्री होताच या मुख्याध्यापिकेने संस्था संचालकांशी चर्चा करून खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास खडक पोलिसांकडून सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.