संग्रहित छायाचित्र
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सायबर चोरट्यांच्या या भूलभुलैयात अडकलेल्या तीन जणांनी तब्बल ९० लाख रुपये गमावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनुक्रमे हडपसर, विश्रांतवाडी, तसेच कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फसवणूक झालेल्या एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवत शेअर बाजरात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या या महिलेने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. अधिक रक्कम गुंतवल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवत आणखी रक्कम उकळण्यात आली. मागील पाच महिन्यात या महिलेने २४ लाख १८ हजार रुपये गमावले. परतावा मिळत नसल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडीतील एकाची चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४१ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत. हडपसर भागातील एका नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी २५ लाख रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार मांजरी भागात वास्तव्यास आहेत. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीची आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.