Modern Hospital Nana Peth : बनावट रुग्णांच्या नावाने महापालिकेला गंडवले; नाना पेठेतील मॉडर्न हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

महापालिकेकडून गरीब रुग्णांना आर्थिक साह्य करण्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना राबवली जाते. खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या बिलात सूट दिली जाते. याचा गैरफायदा घेत नाना पेठेतील मॉडर्न हॉस्पिटलने महापालिकेला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

नाना पेठेतील मॉडर्न हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

बनवल्या शहरी गरीब योजनेच्या खोट्या फाईल; आरोग्य विभागाच्या तपासणीत सत्य उघडकीस

महापालिकेकडून गरीब रुग्णांना आर्थिक साह्य करण्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना राबवली जाते. खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या बिलात सूट दिली जाते. याचा गैरफायदा घेत नाना पेठेतील मॉडर्न  हॉस्पिटलने महापालिकेला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णालयाने तयार केलेल्या १० पैकी ७ रुग्णांच्या फाईल बनावट असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या रुग्णालयाविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाला खोट्या फाईलची कुणकुण लागली. याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शरद प्रकाश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॉडर्न  हॉस्पिटल आणि डॉ. शोयेब नाझीम शेख  (वय ३७, रा. ३११ बी जेधे, पार्क सोसायटी, रास्ता पेठ) यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरी गरीब साहाय्य योजना व अंशदायी वैद्यकीय साहाय्यता योजनाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाकडून केली जात होती. या पथकाने मॉडर्न  हॉस्पिटलला भेट दिली. या मॉडर्न  हॉस्पिटलने गेल्या १० दिवसांमध्ये दिलेल्या १० हमीपत्रांपैकी फक्त ३ रुग्णांच्या नोंदी आयपीडी रजिस्टरमध्ये आढळून आल्या. त्यावेळी इतर सात रुग्णांच्या नोंदी केल्या नसल्याची माहिती आढळून आली. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल नसलेल्या रुग्णांच्या नावाने बिलाच्या खर्चाचे अंदाजपत्रक रुग्ण दाखल असल्याचे दाखवून केल्याचे उघडकीस आले. या रुग्णालयाने संबंधित रुग्णांच्या नावाचे हमीपत्र आरोग्य विभागाकडून मिळवले असल्याचे निर्देशनास आले. तसेच महापालिकेला रुग्णावर न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आल्याचे निर्देशनास आले.  याबाबत संबंधित शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाला अधिकाऱ्यांनी फोन करून माहिती विचारली असता, सत्य माहिती समोर आली. महापालिकेच्या योजनांचा फायदा खोटी माहिती सादर करून त्याचा लाभ या हॉस्पिटलकडून घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी डॉ. शोयेब नाझीम शेख हे मॉडर्न  हॉस्पिटलमधील प्राप्त अधिकाराचा गैरफायदा घेऊन शहरी गरिबी योजनेच्या बनावट फाईल बनवून महापालिकेची आर्थिक फसणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य नेहमी सुदृढ राहावे, यासाठी पुणे महापालिकेकडून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपचारांच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे लागते. योजनेचे सभासद झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेद्वारे एक कार्ड उपलब्ध करून दिले जाते. या कार्डवर लाभार्थ्याला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात. महापालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधेदेखील मोफत उपलब्ध होतात.  मात्र, खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी झालेला एकूण खर्च जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर एक लाखाच्या पुढील रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.

गरीबांसाठी असलेल्या या योजनेचा आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शहरातील नामांकित हॉस्पिटलही महापालिकेची फसवणूक करत असल्याचे प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी विशेष तरतूद केली जाते. रुग्णांना याचा फायदा होत आहे. परंतु हॉस्पिटलकडून होत असलेले फसवणुकीचे प्रकार गंभीर आहेत. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलची तपासणी करून असे गैरप्रकार समोर आणले जाणार का, असा प्रश्न आता पुणेकरांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.  याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून माहिती विचारली असता, याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात असून शहरातील इतर हॉस्पिटलचीही तपासणी केली जाईल, असे सांगितले.

२०२३-२०२४ मध्ये ५८ कोटी रुपयांची तरतूद
शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १३,१७६ सभासद, तर १०,३२२ हून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे. या योजनेचा लाभ महापालिकेत सामाविष्ट झालेल्या गावांनाही दिला जातो.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तपासणी पथकात मॉडर्न  हॉस्पिटलकडून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी या पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. कागदपत्रे खोटी सादर करुन आर्थिक लाभ लाटण्यासाठी हे कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे. किती रुपयांची फसवणूक केली जाणार होती, याची माहिती सध्यातरी नाही. पुढील तपासात ही माहितीही समोर येईल.

 - उमेश गित्ते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे.

Share this story

Latest