Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना पुण्यातून अटक, एकजण अजूनही फरार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ माजली. हत्येला पंचवीस दिवस उलटून गेले तरी आरोपींचा शोध लागत नव्हता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 4 Jan 2025
  • 03:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ माजली. हत्येला पंचवीस दिवस उलटून गेले तरी आरोपींचा शोध लागत नव्हता. मात्र या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. फरार तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दरम्यान तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. 

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वायभसे यांच्यावर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. 

संतोष देशमुख प्रकरणात एकूण सात आरोपी आहेत. त्यापैकी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना आधीच अटक केली होती. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.  या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड समजला जाणारा  वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. कराड याचीही चौकशी सुरू आहे. 

काय आहे प्रकरण? 
मस्साजोग गावाच्या परिसरात अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे.  सुदर्शन घुले याने आपल्या सहकाऱ्यांसोबत ६ डिसेंबरला प्रकल्पाच्या परिसरात राडा घातला होता. त्याने मस्साजोग गावचा रहिवासी असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. याचा राग मनात धरून घुले आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली. सुदर्शन घुले  हा ऊसतोड कामगारांचा मुकादम काम करतो. तो केज तालुक्यातील टाकळी या गावचा रहिवासी आहे. घुले याच्यावर या आधी देखील अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर बीडसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.  मस्साजोगच्या ग्रामस्थांनी फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले होते. तसेच पोलीस प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. तथापि पोलिसांनी आठवडाभरातच दोन फरार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मौन मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.  लवकरच पोलीस अधीक्षक या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराड सोबतच इतरही आरोपींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे ते लवकरच समोर येईल.

Share this story

Latest