संग्रहित छायाचित्र
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका केअरटेकर तरुणाने ८० वर्षांच्या ज्येष्ठाचे हातपाय बांधून आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. त्यानंतर हा तरुण पसार झाला. ज्येष्ठाने आरडाओरडा केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी येऊन त्यांची सुटका केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने २४ तासाच्या आत आरोपीला भुसावळ येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत ज्येष्ठ व्यक्तींचा मुलगा रवींद्र जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ५६, रा. गंगा मेलरोजी, सोपानबाग) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील अग्रसेन सोसायटीत १ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र अग्रवाल यांचे वडिल जगदीशप्रसाद अग्रवाल ८० वर्षांचे आहेत. ते अग्रसेन सोसायटीत एकटेच राहतात. रवींद्र अग्रवाल हे आपल्या कुटुंबासह सोपानबाग येथे राहतात. वडिलांच्या देखभालीसाठी १५ ते २० दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलाला नेमले होते. हा मुलगा येऊन घरातील काही कामे करायचा. तसेच वडिलांना काय हवे नको ते पाहायचा. १ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कामावर आला़. त्याने बेडरुममध्ये वडिलांना नॉयलॉनच्या दोरीने बांधले. रुमालाने तोंड बांधुन ज्येष्ठाला चाकूचा धाक दाखविला. ‘‘तेरे पास जितना पैसा है, वह मुझे दे दे, नही तो यही चाकू से तेरे को मार दुंगा,’’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे असलेले ३२ हजार रुपये व २ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना बेडरुममध्ये बंद करुन तो पळून गेला. जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी कसेतरी करुन तोंडावर बांधलेला रुमाल बाजूला करुन आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणार्यांनी घरात येऊन त्यांची सुटका केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. आरोपी वापरत असलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले गेले. आरोपी कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेने मध्यप्रदेशाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे समजले होते. त्याप्रमाणे भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत सर्व रोख रक्कम व मोबाईल मिळाला. त्याच्याकडील आधार कार्ड, पॅनकार्ड, पी एम आयुष्यमान कार्ड इत्यादी कागदपत्रावरुन तो अल्पवयीन असल्याचे समजले.