गावठी पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्याला पकडले
पुणे: वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (4 जानेवारी) पोलिसांनी एक व्यक्तीला गावठी बनावट पिस्टल आणि जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 2 ने ही कारवाई केली. अविनाश अजय मिसाळ (वय 24, रा. घोरपडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अंमलदार खरात व पोलीस अंमलदार घावटे हे गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ति शिंदे वस्ती येथील बंद असलेल्या कॅनलवरील रस्त्यावर उभा असल्याची आणि त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती त्यांना आपल्या गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये त्याचे नाव अविनाश अजय मिसाळ (वय 24, रा. घोरपडी, पुणे) असल्याचे समजले. मिसाळ याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुस सापडले. त्याची अंदाजे किंमत 25 हजार 500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ताब्यात घेतल्यानंतर अविनाश मिसाळ याच्यावर आर्म अॅक्ट 3(25), मपोका क 37 (1 )(3) सह 135 प्रमाणे गुन्हा नोंद केला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. मिसाळ याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात भादवि कलम 395,307 नुसार याआधी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि खंडणी विरोधी पथक दोनकडील पोलीस अंमलदार यांनी केली.