संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात गुन्हे शाखेने गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ८२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत साडेसात हजार रुपये आहे.
समाधान केदा पवार (वय ३३, लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) आणि संदीप सखाराम खैरनार (वय ३८, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी गुन्हे शाखेने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नवीन वर्षाच्या अनुषंगाने शहरात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बंदोबस्त लावण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक पेट्रोलिंग करत असताना खडक एस पी टी मार्शल वरील पोलीस अंमलदार सुजय रिसबुड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही जण शुक्रवार पेठेमध्ये गांजा विक्रीसाठी येणार आहेत. ही माहिती मिळताच मार्शल यांच्या मदतीसाठी अधिकारी व पोलीस अंमलदारांचे पथक पाठविले. त्यांनी शुक्रवार पेठेतील सुशिल लॉजसमोर रोडवर थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ हजार ५५० रुपयांचा ८२० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, एक दुचाकी असा ४७ हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, विठ्ठल साळुंके, शुभम देसाई, सुजय रिसबुड, रफीक मुल्ला, महेश कुंदे, शशी गाडे आणि अजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.