संग्रहित छायाचित्र
पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाला "आमच्या आधी मटण का खाल्लं?" असा सवाल करता मित्राने फावड्याने मारहाण केली. न्यू इयर पार्टी दरम्यान मटण खाल्ल्यावर दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठा गदारोळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावडा घालून त्याला जखमी केलं आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. निगेश म्हेत्रे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे. या प्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगेश म्हेत्रे आणि धम्मपाल सोनवणे हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. दोघेही खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. दोघेही एकाच खोलीत राहतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते एकत्र पार्टी करत होते. यावेळी म्हेत्रेने आमच्या अगोदर मटण का खाल्लं? असा सवाल केला. ज्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात सोनवणेने म्हेत्रेला शिवीगाळ करत फावड्याच्या दांडक्याने मारहाण केली. ज्यामुळे म्हेत्रेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.